कर्जत : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया सुनील शेलार यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी काल, शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत केली. नगराध्यक्ष पदासाठी छाया शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. या निवडीसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नगरसेवक एकत्र येत सत्तांतर घडवले. त्यामुळे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ‘एनडीए’मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधील या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या चर्चांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

छाया शेलार यांची निवड झाल्यानंतर सर्व उपस्थित १३ नगरसेवकांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून गुलाल उधळून पेढे वाटून, मिरवणूक काढून ग्रामदैवत गोधड महाराजांचे दर्शन घेण्यात आले. तेथील सभेस जामखेडच्या नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, सभापती काकासाहेब तापकीर,अमित चिंतामणी, तालुकाध्यक्ष अनिल गदादे, जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब धांडे, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, सुनील यादव, शांतीलाल कोपनर, रवींद्र सुपेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा रेणुकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनील शेलार म्हणाले की, गोदड महाराजांचै पवित्र भूमीत फसवा फसवी चे राजकारण चालत नाही आणि कुठल्याही गोष्टीचा अतिरेक महाराज चालू देत नाहीत. सभापती राम शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण करताना आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला संधी दिली. शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी रोहित पवार व राम शिंदे एकत्र आल्याची टीका विरोधकांनी केली मात्र बिनबुडाचे आरोप करत दुसऱ्याला फसवून सत्ता मिळवायची हेच राजकारण विरोधकांनी केले. अशा राजकारणाला थारा जनता देणार नाही.

नगराध्यक्ष छाया शेलार राष्ट्रवादीच्याच!

शेतकरी कर्जमाफी, एमपीएससीचे विद्यार्थी, कांद्याचा दरवाढ या प्रश्नांसाठी राज्यभर फिरत असल्यामुळे कर्जत नगरपंचायतच्या घडामोडींकडे लक्ष दिले नाही. अनेक नगरसेवकांना याबाबत अधिकार दिले होते. नगराध्यक्ष झालेल्या छाया शेलार या नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर व चिन्हावर निवडून आल्या आहेत. – आमदार रोहित पवार

दोन्ही पक्षाच्या समर्थकांची एकत्र घोषणाबाजी

नगराध्यक्ष निवडीनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जल्लोष केला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या समर्थनार्थ तर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी रोहित पवार यांच्या नावाच्या घोषणा देत उत्साह व्यक्त केला.

शहर विकासासाठी एकत्र

नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नगरसेवक एकत्र आले मात्र यामध्ये रोहित पवार यांचा कोणताही सहभाग नाही. त्यांनी याबाबत आमच्यावर जबाबदारी निर्णय घेण्याची सोपवली होती. त्यानुसार आम्ही भाजपसोबत जनतेसाठी व शहर विकासाला प्राधान्य देण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी सांगितले.