कर्जत : नगरपंचायतच्या सत्तेसाठी पुन्हा नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण घुले यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना धक्का देत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे तर त्यांच्या भावजय नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान गेल्या सत्तांतरावेळी फुटलेल्या १३ पैकी तिघांनी पुन्हा वेगळी भूमिका घेतली तर उर्वरित १० नगरसेवकांनी राम शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये फुटीर ८ व भाजपच्या दोघांचा समावेश आहे.
कर्जत नगरपंचायतमध्ये एकूण १७ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व काँग्रेस पक्षाचे १५ निवडून आले. सत्ता आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली मात्र अडीच वर्षानंतर १५ पैकी ११ नगरसेवकांनी सभापती राम शिंदे यांना पाठिंबा दिला व भाजप प्रवेश करत नगरपंचायतमध्ये सत्तांतरी केले.
अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सभापती राम शिंदे यांनी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने कायद्यात बदल केला. या कायद्याचा आधार घेत राज्यातील पहिला अविश्वास ठराव कर्जत नगराध्यक्षांवर (शरद पवार गट) दाखल करण्यात आला. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये या घडामोडी घडल्या.
नगराध्यक्षपदी रोहिणी घुले व उपनगराध्यक्षपदी संतोष मेहत्रे यांची निवड करण्यात आली. दोघांना १० महिने १३ दिवसांची मुदत देण्यात आली. ती पूर्ण झाल्यावर नगराध्यक्ष पदासाठी छाया शेलार व उपनगराध्यक्ष पदासाठी सतीश पाटील यांना संधी देण्याचे ठरले. मुदत संपल्यानंतर सभापती शिंदे यांनी नगराध्यक्ष रोहिणी घुले व उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांना राजीनामा देण्यास सांगितले. उपनगराध्यक्ष मेहत्रे यांनी नगराध्यक्षांकडे राजीनामा दिला, मात्र त्यांनी स्वीकारला नाही, असे मेहेत्रे यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला.
नगरपंचायतमधील १३ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी काल, सोमवारी रात्री सभापती राम शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. गटनेते संतोष मेहत्रे, सतीश पाटील, सचिन कुलथे, देवा खरात, ओंकार तोटे, लालासाहेब शेळके, सुनील शेलार, रवींद्र सुपेकर, विनोद दळवी, दत्तात्रय पिसाळ व भाजप तालुकाध्यक्ष अनिल गदादे उपस्थित होते.
कायद्यातील बदल अंगलट
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण घुले यांनी दोन वर्षांपूर्वी सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांनी राम शिंदे यांची साथ सोडत नगराध्यक्ष रोहिणी घुले यांचे पती सचिन घुले यांच्यासह कापरेवाडीचे सरपंच अनिल खराडे, अबीजळगावचे सरपंच विलास निकत आदींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
सभापती राम शिंदे यांना हा धक्का मानला जातो. सातारा येथील घटनेनंतर लगेचच कर्जतमध्ये नगराध्यक्षांच्या पतीसह भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता नगरपंचायतच्या सत्तांतराकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बहुमतासाठी १२ नगरसेवकांची आवश्यकता असल्याने असताना राम शिंदे यांच्याकडे १० च नगरसेवक आहेत.
