अलिबाग : टोरंट पॉवर प्रकल्पासाठी २३३ हेक्टर वनजमीन हस्तांतरित करण्यावरून आणि त्यासाठी झालेल्या वृक्षतोडीवरून संताप व्यक्त होत असतानाच, आता आणखी एका धरणासाठी कर्जत तालुक्यातील वनजमिनीची मागणी केली जाणार असल्याचे समोर आले आहे. पोशीर या प्रस्तावित धरणासाठी तब्बल ७७७ हेक्टर वनजमीन हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील पाण्याची तहान भागविण्यासाठी कर्जत तालुक्यात तब्बल सात धरणे उभारली जाणार आहेत. यापैकी पाली-भूतिवली आणि टाटा पॉवर धरणांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कोंढाणे, पोशीर आणि शिलार या धरणांसह टोरंट पॉवर प्रकल्पाअंतर्गत दोन धरणे प्रस्तावित आहेत.

टोरंट पॉवर प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून, त्यासाठी भीमाशंकर अभयारण्यालगतच्या परिसरातील २३३ हेक्टर वनजमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. आता पोशीर धरणासाठी आणखी ७७७ हेक्टर वनजमीन हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून सुमारे एक हजार हेक्टर वनजमीन बाधित होण्याची शक्यता आहे.

पोशीर धरणासाठी कर्जत तालुक्यातील सहा गावांमधील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या वनक्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. अलिबागच्या उपवनसंरक्षक कार्यालयाने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला, तरी या प्रकल्पासाठी वनजमिनीची मागणी असल्याचे मान्य केले आहे.

जमीन हस्तांतरणासाठी प्रयत्न

कुरुंग गावाजवळ पोशीर धरणाची उभारणी करण्यात येणार आहे. सुमारे ६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. १२ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वनजमीन हस्तांतरणाचे प्रयत्न सुरू आहेत.

आमच्या भागात भरपूर पाऊस पडतो म्हणून एकाच तालुक्यात सात धरणे बांधली जात आहेत. या प्रकल्पांमुळे येथील वने उद्ध्वस्त होणार आहेत. दुसरीकडे, कर्जतकरांच्या हक्काचे पाणी अडवून ते मुंबई महानगर प्रदेशात वळवले जाणार आहे. एकाच वेळी उभारल्या जाणार्‍या या धरणांचा स्थानिक परिसंस्थेवर किती व्यापक परिणाम होईल, याचा विचार कोण करणार? -ॲड. कैलास मोरे, अध्यक्ष, कर्जत पर्यावरण बचाव समिती