कर्जत : मागील चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत शहरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, काही रस्त्यांवर नदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना रस्त्यावरून वाहने चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुख्य रस्त्यांवर पाण्याचा पूर
कर्जत शहरामधे सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस पडला आहे, शनिवारी दिवसभर आणि आज रविवारी देखील सकाळपासूनच जोरदार पाऊस पडला. सातत्याने कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे कर्जत शहराच्या मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, महाविद्यालय चौक, मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून आले. रस्त्यांवरून पाण्याचा प्रवाह सुरू असल्यामुळे वाहनांची व नागरिकांची हालचाल ठप्प झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील पाणी झपाट्याने वाहून जात असल्यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नाही.
मे महिन्यामध्ये प्रथमच जोरदार पाऊस
मे महिन्यामध्ये प्रथमच जोरदार पाऊस कर्जत तालुक्यामध्ये झाला आहे. अनेक जाणकार व्यक्तींच्या सांगण्यानुसार यापूर्वी अशा पद्धतीचा पाऊस कधीही तालुक्यात पडलेला नव्हता. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडवली आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान, खरीप हंगामावर परिणाम
या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, डाळिंब व इतर फळबागा तसेच कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. मान्सून जवळ आला आहे. याच पावसाने अनेकांच्या शेतजमिनी पाण्यात गेल्या आहेत. मान्सून जर सक्रिय झाला तर शेतामध्ये वापसा होणार नाही व खरीप हंगामाच्या पेरण्या यामुळे खोळंबल्या असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नाल्यांपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान विभागाने पुढील २४ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
तहसीलदार, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.तहसीलदार गुरू बिराजदार