कर्जत: खाजगी दूध उत्पादकांच्या तीव्र स्पर्धेत शेतकऱ्यांना आधार ठरणारा, कर्जतच्या सहकार महर्षी रावसाहेब ऊर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया संघाला (कर्जत तालुका दूध संघ, अहिल्यानगर) शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या जागेसह यंत्रसामुग्री कायमस्वरूपी हस्तांतरण करण्याच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाने मंजूरी दिली.

संस्थेचे अध्यक्ष मंगेश जगताप यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रयत्नातून ही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दि. ११ नोव्हेंबर २००२ च्या शासन निर्णयानुसार इतर सहकारी दूध संघांच्या धर्तीवर, शीतकरण केंद्र जागेसह बाजारभावाच्या ५० टक्के दराने कायमस्वरूपी मालकी तत्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात आला. नियमात शिथिलता देत, कर्जत येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रातील यंत्रसामग्री, फर्निचर, वनसंपदा व इतर साहित्याची १०० टक्के रक्कम तसेच जमिनीच्या सध्याच्या सरकारी दरमूल्याच्या ५० टक्के रकमेचा भरणा करून केंद्र कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली.

पत्रकारांना माहिती देताना मंगेश जगताप यांनी सांगितले की, या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सभापती राम शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली ४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत येथे उच्चस्तरीय बैठक झाली. त्या बैठकीत दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विषय मंत्रीमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन दिले होते. अखेर आज, गुरुवारी मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे.

सन २०१८ पासून दुधसंघ शीतकरण केंद्राच्या जागेसह मालकी हक्काने देण्याची मागणी शासनाकडे करत होता. संघाची दूध संकलन क्षमता प्रतिदिन ११ हजार लिटर आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सुविधा देता याव्यात, यादृष्टीने जागा मालकी हक्काने मिळावी, यासाठीचे प्रयत्न आता फळाला आले आहेत. एकूण मूल्यांकन १ कोटी २७ लाख १ हजार ९२५ रुपये असून, अटी-शर्तींनुसार संघाने आतापर्यंत तीन हप्त्यांत ७६,२१,१५५ रुपये भरले आहेत; उर्वरित रक्कम दोन हप्त्यांत भरण्यात येणार आहे.

तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही घटना असल्याचा उल्लेख श्री जगताप यांनी केला. या निर्णयाचे दुधसंघाचे उपाध्यक्ष दादासाहेब खराडे, संचालक काकासाहेब धांडे, शंकर देशमुख, भाऊसाहेब निंबाळकर, अंकुश दळवी, शामराव काळे, तात्याभाऊ घालमे, रामजी सूर्यवंशी, दत्तू तनपुरे, दत्तात्रय पाटील आदींनी स्वागत केले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळाचे आभार मानण्यात आले.