अहिल्यानगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार राहुल जगताप यांच्या अधिपत्याखालील कर्मवीर कुंडलिकराव जगताप (कुकडी) सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेने थकबाकीपोटी आज, सोमवारी जप्त केला. जिल्हा बँकेने कर्जाच्या थकबाकीपोटी जप्त केलेला हा दुसरा कारखाना आहे. जिल्हा बँकेच्या प्रशासक तथा विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी जप्तीच्या या कारवाईला ‘लोकसत्ता’शी बोलताना दुजोरा दिला.

कुकडी कारखाना श्रीगोंदे तालुक्यात आहे. माजी आमदार राहुल जगताप कारखान्याचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात होते. त्यांनी पूर्वी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडे (एनसीडीसी) कारखान्यासाठी पॅकेजची मागणी केली होती. त्यावेळी त्यांचा प्रस्ताव महायुती सरकारकडून नामंजूर झाला होता. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. ज्या बँकेने जगताप यांच्या अधिपत्याखाली कारखाना जप्त केला, त्या बँकेचे जगताप हे माजी संचालक आहेत.

कुकडी कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. यंदाच्या हंगामातही तो सद्य परिस्थितीमुळे सुरू होणारा नाही. कारखान्याने जिल्हा बँकेकडून सुमारे ३५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड झाली नाही. व्याजासह ही रक्कम आता ३७० कोटींवर पोचली आहे. त्यामुळे बँकेने त्यांना वारंवार जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्याला मुदतवाढही दिली होती. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अस्तित्वात होते. संचालक मंडळ असतानाच या नोटीसा बजावल्या गेल्या होत्या. आता संचालक मंडळाची मुदत संपली आहे. बँकेवर प्रशासक म्हणून संगीता डोंगरे यांची नियुक्ती झाली आहे. प्रशासकीय राजवटीत प्रत्यक्ष जप्तीची कारवाई झाली.

बँकेने जप्तीच्या कारवाईसाठी सर व्यवस्थापक सुरेश पाटील यांना प्राधिकृत केले होते. बँक अधिकाऱ्यांच्या पथकाने आज जप्तीची नोटीस कारखान्याच्या गेटवर चिकटवली. अर्थात ही जप्ती प्रतिनिधी स्वरूपाची आहे. ‘सरफेसी’ कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेने यापूर्वी राहुरीतील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना थकबाकी पोटी जप्त केला. तनपुरे कारखान्यावरील कर्ज व्याजासह सुमारे १५० कोटींवर पोहोचले आहे. तनपुरे कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करून वसुली करण्याचे जिल्हा बँकेचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन; जगताप यांचा दावा

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना माजी आमदार तथा कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी सांगितले की, कारखान्याच्या मदतीचा प्रस्ताव पुन्हा ‘एनसीडीसी’कडे पाठवला आहे. मुख्यमंत्र्यांनी तो मंजूर करण्याचे आश्वासन दिला आहे. त्यामुळे पुढील महिन्यात कर्जाचा विषय मार्गी लागेल. जिल्हा बँकेकडे हप्ते पाडून देण्याची मागणी केली जाणार आहे.

साखर कारखान्यांकडे ५७८ कोटींची थकबाकी

जिल्हा बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ५७८ कोटी रुपयांची थकबाकी निर्माण झाली आहे. त्यामध्ये अगस्ती, गणेश, तनपुरे, कर्मयोगी कुंडलिकराव जगताप व अवसायानात गेलेला नगर तालुका सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे.

भाजप नेत्याचे प्रयत्न

काही दिवसांपूर्वी कुकडी कारखाना भाजपचा एक नेता चालवण्यास घेणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई टाळावी यासाठी या नेत्याने प्रयत्नही केले होते. त्यातूनच नोटीस बजावली गेली तरी मुदतवाढही दिली गेली. मात्र अखेर जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई केली.