धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत? करुणा मुंडे उलगडणार प्रेमकथा; फेसबुक पोस्टमुळे खळबळ

करुणा मुंडे यांची पुस्तक प्रकाशित करत असल्याची घोषणा

बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे बलात्काराच्या आरोपानंतर शांत झालेला वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

धनंजय मुंडे प्रकरणात मोठी अपडेट, तक्रारदार महिलेची माघार; ट्विट करत म्हणाली…

करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जाहीर केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच खुलासा करत, “तक्रार करणाऱ्या रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत,” अशी कबुली दिली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला होता. पण आता करुणा धनंजय मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जाहीर केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

करुणा धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट-
“माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे,” असं सांगत करुणा धनंजय मुंडे यांनी सोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये एक प्रेमकथा लवकरच असा उल्लेख असून खाली आश्चर्यजनक प्रेमकथा असंही लिहिण्यात आलेलं दिसत आहे.

करुणा यांची बहिण रेणू शर्मा यांनी पुढाकार घेत धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. पण नंतर त्यांनी तक्रार मागे घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोवर कोणताही कारवाई न कऱण्याचा निर्णय घेतला होता. तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला होता. पण आता करुणा मुंडे पुस्तकाच्या निमित्ताने अजून कोणत्या गोष्टी नव्याने समोर आणतात हे पहावं लागणार आहे.

तक्रार मागे घेतली
धनंडय मुंडे यांच्यावरील आरोपानंतर भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली होती. याशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश होती. यानंतर रेणू शर्मा यांनी आपण माघार घेत असल्याचं ट्विट केलं होतं.

धनंजय मुडेंवर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

रेणू शर्मा यांनी ट्विट करत आपण तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते असं म्हटलं होतं. “एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते,” असं रेणू शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

“जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा,” असंही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Karuna dhananjay munde facebook post announce release of book ek prem katha sgy