अलिबाग : काशीद समुद्र किनाऱ्या बुडत असलेल्या दोन पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या मदतीने त्यांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. रोबोटीक तत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात पहिल्यांदाच दोघांचा बचाव करण्याची ही पहिलीच घटना आहे.
डोंबिवली येथून आलेले फुरकन शेख (वय २८) आणि कैफ शेख (वय २२) काशीद समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले होते. बुधवारी दुपारी दोघेही पोहण्यासाठी समुद्रात उतरले. पाण्याच अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे त्यांनी बचावासाठी आरडाओरड सुरू केली. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेले पोलीस हवालदार रोटकर आणि जीवरक्षक प्रथमेश लाड यांनी याबाबतची माहिती मिळताच, किनाऱ्यावर धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. काही क्षणात रोबोटीक वॉटर क्राफ्ट दोघांपर्यंत पोहोचली. रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या साह्याने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असून नातेवाईकांच्या मदतीने त्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वीच नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर रिमोटच्या साह्याने वापरण्यात येणाऱ्या रोबोटीक वॉटर क्राफ्ट उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून १२ एप्रिल २०२६ रोजी या उपकरणांचे वितरण करण्यात आले होते. या आधुनिक उपकरणामुळे काशीद बीचवरील बचावकार्य अधिक जलद आणि प्रभावी ठरले आहे. लवकरच जिल्ह्यातील इतर समुद्र किनाऱ्यांवरही अशाच रोबोटीक वॉटर क्राफ्ट उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी या घटनेनंतर स्पष्ट केले आहे.
