देशमुख यांच्या निवडीमुळे मसापचा प्रभाव पुन्हा सिद्ध!

कौतिकराव ठाले पाटील यांनी देशमुख यांना निवडून आणण्यात पुढाकार घेतला होता,

laxmikant deshmukh
९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड
बडोद्यात येत्या फेब्रुवारीमध्ये भरणाऱ्या ९१ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाल्यानंतर या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठवाडा साहित्य परिषद तसेच या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रभाव पुन्हा एकदा स्पष्ट झाला. कौतिकराव ठाले पाटील यांनी देशमुख यांना निवडून आणण्यात पुढाकार घेतला होता, त्यात ते यशस्वी ठरले!

आगामी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षांसंदर्भात वाङ्मयीन वर्तुळात काही महिन्यांपूर्वी चर्चा सुरू झाली, तेव्हा औरंगाबादच्या मसापकडून निवृत्त न्यायमूर्ती व विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांचे नाव पुढे आले होते. औरंगाबादेतील ठाले आणि इतर काही मंडळींनी त्यांची संमती मिळविण्याचा प्रयत्न केला; पण चपळगावकर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर पुण्यात स्थायिक असलेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांचे नाव पुढे आले. पुणे आणि औरंगाबाद या दोन ठिकाणांहून त्यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बहुतांश कार्यकारिणी सदस्यांनी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार केला; पण परिषदेच्या एका पदाधिकाऱ्याने अन्य उमेदवारास पािठबा देण्याची ठाले यांना न रुचणारी भूमिका पार पाडली, असे निवडणुकीदरम्यान दिसून आले होते. त्यातच एका निनावी पत्रावरून या निवडणुकीच्या संबंधाने उलटसुलट चर्चाही झाली.

देशमुख मूळचे मराठवाडय़ाचे रहिवासी आहेत. ते दीर्घकाळ राज्य शासनाच्या सेवेत होते आणि शेवटी सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाले. शासकीय सेवेदरम्यान त्यांनी तत्कालीन नांदेड नगर परिषदेत मुख्याधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली होती. अलीकडच्या काळात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. फ. मुं. िशदे, श्रीपाल सबनीस या मराठवाडी भूमिपुत्रांना संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. त्यांच्या निवडीतही मराठवाडा साहित्य परिषदेची भूमिका निर्णायक राहिली होती.

त्यांच्यानंतर आता देशमुख संमेलनाध्यक्षपदी विराजमान झाले. २०१३ ते २०१८ या काळातील सहा संमेलनांच्या अध्यक्षांपैकी चार जण मराठवाडय़ाच्या मातीतील आहेत. या बाबीचे विभागातील साहित्यिकांना अप्रूप वाटत असून मसापच्या नांदेड शाखेचे कार्यवाह प्रभाकर कानडखेडकर, देवीदास फुलारी प्रभृतींनी देशमुख यांच्या निवडीचे स्वागत केले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या पावणेदोनशे मतदारांपैकी दीडशेहून अधिक मतदारांनी देशमुखांच्या उमेदवारीला पसंती दिली; पण लातूर येथील एकाने यंदाच्या निवडणुकीदरम्यान एक वेगळाच ‘पॅटर्न’ आणण्याचा खटाटोप करताना निनावी पत्रातून खळबळही उडवून दिली, तरी ठाले यांनी देशमुख यांच्या निवडीसाठी आखलेल्या रणनीतीची शेवटी सरशी झाली.

ठाले ठरवतील तो अध्यक्ष !

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष हे ज्या उमेदवारामागे ताकद उभी करतील तो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, असेच अलीकडच्या काळात घडलेले आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, फ. मु. शिंदे, श्रीपाल सबनीस यांच्यानंतर आता लक्ष्मीकांत देशमुख हे चौथे संमेलनाध्यक्ष मराठवाडय़ाचे आहेत. त्यात डॉ. कोत्तापल्ले यांनी आपण केवळ ठाले पाटील यांच्या पाठबळामुळेच अध्यक्ष झाल्याची कबुली दिली होती. अशीच प्रतिक्रिया गतवर्षी डोंबिवली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी त्यांच्या निवडीनंतर मसापच्या वतीने आयोजित सत्कारप्रसंगी दिली होती. आता पुन्हा लक्ष्मीकांत देशमुख यांच्यामागे ठाले यांनी ताकद उभी केल्याचे दिसत आहे. कौतिकराव ठाले मात्र, हे खरं नाही, असे सांगतात. चांगल्या उमेदवारांच्या मागे आम्ही उभे राहतो, एवढीच प्रतिक्रिया ते देतात.

मराठवाडय़ाचा माणूस अध्यक्ष झाल्याचा आनंद

अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षपदी देशमुख यांच्या रूपाने मराठवाडय़ाचा माणूस निवडला गेला, याचा विशेष आनंद झाला. आम्ही केलेल्या मेहनतीचे चीज झाले. इतर उमेदवारही देशमुख यांच्याच तुलनेतले होते. शिवाय देशमुख हे मसापचेच उमेदवार होते आणि त्यांच्या मागे उभे राहणे आमचे कर्तव्यच होते. लातूरच्या मतदाराने एक निनावी पत्र पाठवले होते. त्यातून काहीसी नकारात्मक चर्चा झडली. ते कोणी, का केले याची सर्व माहिती हाती आहे. एका उमेदवाराने नैराश्यातून आपल्या हस्तकामार्फत हा प्रकार घडवला होता. अशा प्रकाराची दखल घ्यावी वाटली नाही. आम्हाला देशमुख यांचा विजय महत्त्वाचा होता. त्यावरच लक्ष केंद्रित केले होते.

कौतिकराव ठाले, अध्यक्ष, मसाप

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kautikrao thale patil laxmikant deshmukh marathi sahitya sammelan president

ताज्या बातम्या