संगमनेर: प्रसिद्ध कवी, शायर, निवेदक, बहुभाषाप्रभू तथा केंद्रीय श्रम मंत्रालयाचे माजी आयुक्त के. सी. खुराना ऊर्फ कृष्णचंद खुराणा यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी संगमनेर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य, कला, प्रशासन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले खुराणा यांचा जन्म १ जानेवारी १९२६ रोजी आताच्या पाकिस्तानमध्ये झाला. जीवनातील प्रदीर्घकाळ त्यांचे वास्तव्य दिल्लीमध्ये होते. हिंदी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी, फारसी, पश्तू आणि थाई या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

या सर्व भाषांतील शब्दांचे भांडार, त्यांचे अचूक उच्चार यासह अत्यंत प्रभावी निवेदनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष वैशिष्ट्ये होती. सुप्रसिद्ध पार्श्वगायक मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी सुमारे पाच दशके काम केले. कादर खान, अमजद खान, मोहम्मद रफी, तलत महमूद, कविता कृष्णमूर्ती यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत निवेदक म्हणूनही त्यांनी काम केले. अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि रशिया आदी देशांचा त्यांनी प्रवास केला. अमेरिकेतील ह्युस्टन आकाशवाणी केंद्रावरही त्यांनी काम केले.

दोन दिवसांपूर्वी संगमनेरमधील काही मित्र त्यांना भेटावयास गेले होते. त्यावेळी त्यांनी डॉ. बशीर बद्र यांच्या, ‘उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, ना जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाए।’ या ओळी ऐकवल्या होत्या, अशी आठवण भारत रेघाटे यांनी सांगितली. खुराणा यांच्या पश्चात अमेरिकेतील टेक्सास येथे स्थायिक असलेला मुलगा संदीप, सून मानसोपचार तज्ञ डॉ. लुचिया, संगमनेरस्थित मुलगी प्रा. सुदर्शन डंग, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

संगमनेरशी अनोखे नाते..

खुराणा यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या शहरात वास्तव्यास होते, याची कल्पना बहुतांश संगमनेरकरांना नसावी. त्यांची मुलगी प्रा. सुदर्शन या संगमनेरमधील डंग परिवाराच्या सुन आहेत. सहाजिकच सुट्ट्यांच्या कालावधीत एप्रिल, मे महिन्यात खुराणा मुलीकडे येत असत. त्यानिमित्ताने संगमनेरमध्ये त्यांचा काही मित्रपरिवार झाला होता. अखेरच्या काळात मुलगी प्रा. सुदर्शन डंग यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी वास्तव्यास असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.