तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर आज अहेरी येथील माजी आमदार दीपक आत्राम यांनी केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, यावेळी झालेल्या सभेत बोलताना केसीआर यांनी शेतकरी आत्महत्या आणि पाण्याचे नियोजनावरून राज्यासह केंद्र सरकार टीका केली.
नेमकं काय म्हणाले केसीआर?
देशात आज परिवर्तनाची आवश्यता आहे. देशाला आज स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली आहेत. यादरम्यान देशात अनेकदा सरकारे बदलली. अनेक नेते, आमदार खासदार बदलले. अनेकांनी मोठी आश्वासने दिली. मात्र, आज देशात पिण्यासाठी पाणी नाही, शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी नाही, गरिबांना आज वीजदेखील मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी आपण समजून घेऊन एकत्र लढा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया के.चंद्रशेखर राव यांनी दिली.
आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याचं कारण काय? जेव्हा सर्व रस्ते बंद असतात, तेव्हाच माणूस आत्महत्या करतो. देशाला अन्न देणारा अन्नदाता आज आत्महत्या करण्यासाठी मजबूर झाला आहे. यापेक्षा वाईट कोणतीही गोष्ट नाही. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहे, तर राजकीय नेते विधानसभेत आणि संसदेत भाषण देण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे ‘अबकी बार किसान सरकार’, अशा नारा बीआरएस पार्टीने दिला आहे, असेही म्हणाले.
देशात आज ४२ टक्के शेतकरी आहेत. त्यात आणखी शेतमजुरांची संख्या जोडली, तर ही आकडेवारी ५० टक्क्यांच्यावर जाते आणि सरकार बनवण्यासाठी एवढी संख्या पुरेशी आहे. फक्त आपल्याला जाती धर्माच्या आधारे न लढता, एकत्र येऊन काम करावे लागेल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच भारत हा बुद्धीजिविंचा देश आहे, बुद्धू लोकांचा देश नाही, असेही ते म्हणाले.