राहाता: गाव म्हटलं की परंपरा आल्याच, पण काही परंपरा इतक्या वैशिष्ट्यपूर्ण असतात की त्या आधुनिक काळातही सर्वांचे लक्ष वेधून घेतात. तालुक्यातील केलवड या छोट्याशा गावाने आपली अशीच एक अनोखी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जोपासली आहे. धुलिवंदनाच्या दिवशी गावात येणारा ‘डसन डुक्कर आणि त्याने ग्रामस्थांना दिलेला आशीर्वाद’, हे या गावचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
केलवड गावात गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. गावात दरवर्षी होळी नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी डसन डुक्कर नावाचे सोंग घेण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. या दिवशी या गावातील आत्माराम गमे व किशोर गमे हे या डसन डुकराचे सोंग घेतात, म्हणजेच एक डुक्कर किंवा वराह अवतारातील रूप घेऊन हातात स्मशानातील सूप व झाडू (केरसुणी) घेऊन सायंकाळी सहा वाजता एका वाड्यातून निघतात.
त्यानंतर आदल्याच दिवशी झालेल्या होळीच्या राखेचे दर्शन घेऊन आणि ती राग कपाळाला लावून आपले मार्गक्रमण गावातून सुरू करतात सनई आणि पारंपारिक वाद्य यांच्यासमोर मनमुराद नृत्य करतात. यात संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झालेले असतात.काल, मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण सायंकाळी संपल्यानंतर मंगळवारी रात्री धुलिवंदनाच्या दिवशी डसन डुक्कर यांनी गावात प्रवेश केला. हा डसन डुक्कर केवळ गावात येत नाही, तर तो रीतसर गावातील होळीचे दर्शन घेतो.
त्यानंतर गावाचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालतो. या प्रथेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी हा डसन डुक्कर गावात जमलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर झाडू (केरसुनी) आणि सूप मारतो. ग्रामस्थ याला देवाचा आशीर्वाद समजतात. असे केल्याने गावावरील अरिष्ट टळते आणि सुख-समृद्धी येते,अशी केलवडकरांची गाढ श्रद्धा आहे.
लेकी-सुनांचा माहेरचा ओढा
या परंपरेचे महत्त्व इतके मोठे आहे की, लग्नानंतर सासरी गेलेल्या गावातील मुली या दिवशी आवर्जून माहेरी येतात. हा सण म्हणजे त्यांच्यासाठी माहेरच्या भेटीची आणि या अनोख्या उत्सवात सहभागी होण्याची मोठी संधी असते. धुलिवंदनाचा हा दिवस केलवडमधील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेक महिला आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून नवस बोलतात.
हा नवस पूर्ण करण्यासाठी महिला मंदिरात दंडवत घालत येतात. रंगांच्या खेळण्यापेक्षा या परंपरेचे पालन करत महिला हा दिवस अतिशय आनंदाने आणि भक्तीभावाने साजरा करतात. श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगातही केलवडच्या ग्रामस्थांनी आपली ही प्राचीन परंपरा खंडित होऊ दिलेली नाही. उलट, दरवर्षी अधिक उत्साहाने ही परंपरा साजरी केली जाते.
गावाने जपली परंपरा
या अनोख्या परंपरेमुळे गावात मनोरंजनाचा कार्यक्रम होतो. हा उत्सव कधी सुरू झाला. कधीच कुणाला आठवत नाही. याचे कारण हे आजोबा व पणजोबांना सांगता आलेले नाही. शेकडो वर्षापासून ही अनोखी परंपरा गावात सुरू आहे. स्मशानातील सुपाचा व झाडूचा (केरसुनीचा) स्पर्श किंवा प्रसाद प्रत्येकाला मिळावा यासाठी प्रत्येक जण धडपड करीत असतो आणि ज्यांना ज्यांना हा प्रसाद मिळातो त्यांचे संपूर्ण वर्ष हे सुखाचे भरभराटीचे व आनंदाचे जाते, असा ग्रामस्थांचा समज आणि अनुभव सुद्धा आहे. -किशोर गमे, ग्रामस्थ, केलवड, राहाता
