Sejal Pawar Viral Video updates : प्रणित मोरेच्या ‘क्राऊड वर्क’ कार्यक्रमात आपल्या वक्तव्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या डॉ. सेजल पवारचा आणखी एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध केईएम रुग्णालयात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सेजलचा हा व्हिडीओ एका मॉलमधील असून, त्यामध्ये ती आपल्या कॉलेजविषयी माहिती देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, सेजल पवारवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

सोशल मीडिया अकाउंट केले डी-अॅक्टिव्हेट

पहिल्या वादानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला गेल्यामुळे सेजलने तिचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट डी-अॅक्टिव्हेट (बंद) केले. मात्र, त्यानंतरही तिचे जुने व्हिडीओ आता इतर वेगवेगळ्या सोशल मीडिया खात्यांवरून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. सध्या व्हायरल झालेल्या नव्या व्हिडीओमध्ये, एक तरुण तिला तिच्या कॉलेजविषयी काही रंजक प्रश्न विचारताना दिसत आहे.

व्हिडीओ आऊटलेट मॉल ऑफ इंडियामधील?

या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘आऊटलेट मॉल ऑफ इंडिया’चा लाल पडदा स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडीओ त्याच मॉलमध्ये चित्रीत करण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्कॅमसिट या कार्यक्रमात ती बोलत होती. दिव्या फोफानी हा इन्फ्लुअन्सर हा कार्यक्रम होस्ट करतो.

व्हिडीओमधील प्रश्नोत्तर जसेच्या तसे:

व्हिडीओमध्ये समोरचा तरुण सेजलला तिच्या कॉलेजच्या अनुभवांबद्दल काही प्रश्न विचारतो. सुरुवातीला ती कॉलेजचे नाव सांगत नाही, मात्र उत्तरांवरून अंदाज लावणे कठीण झाल्याने शेवटी ती स्वतःच केईएम (KEM) रुग्णालयाचे नाव सांगते.

प्रश्न: “तुझ्या कॉलेजमधील सर्वात प्रसिद्ध गोष्ट कोणती आहे?”

सेजल: “आम्ही मृतदेह कापण्यासाठी प्रसिद्ध आहोत.”

प्रश्न: “तू तुझ्या कॉलेजमधील मुलांना डेट करतेस का?”

सेजल: “नाही, ते फार वाईट दिसतात.”

प्रश्न: “तुझ्या कॉलेजमधील सर्वात मोठा ‘रेड फ्लॅग’ (वाईट गोष्ट) काय आहे?”

सेजल: “आमच्या कॉलेजची फॅकल्टी फार ‘टॉक्सिक’ (त्रासदायक) आहे.”

प्रश्न: “जर तुझं कॉलेज एखादा खाद्यपदार्थ (Food Item) असतं, तर ते कोणतं असतं?”

सेजल: “ग्लुकॉन-डी (Glucon-D).”

प्रश्न: “जर तुझं कॉलेज एखादा ब्रँड असतं, तर तो कोणता असता?”

सेजल: “कोणताही ब्रँड नाही, माझं कॉलेज ‘चिंधी’ आहे. तिथे सतत डिस्काउंट्स मागितले जातात.”

प्रश्न: “जर तुझं कॉलेज एखादा बॉलिवूड चित्रपट असतं, तर तो कोणता असता?”

सेजल: “‘मुन्नाभाई एमबीबीएस’ (Munna Bhai M.B.B.S.).”

यावर तो तरुण म्हणतो की, “याचा अर्थ तुझे कॉलेज एखादे असे मेडिकल कॉलेज आहे, जिथे सर्वांना शिकायला जायची इच्छा असते.” यावर ती होकारार्थी मान हालवते.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या भावी डॉक्टरची आपल्याच कॉलेज, प्राध्यापक आणि सहकाऱ्यांबद्दल अशी भाषा असणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न विचारत नेटकरी तिच्यावर कडक कारवाईची मागणी करत आहेत.

दरम्यान, सेजल पवारला केईएम रुग्णालयाने १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याकरता पाच सदस्यी समितीची स्थापना करण्यात येणार आहेत. तसंच, तिची बाजू मांडण्यासाठीही संधी देण्यात येणार आहे.