Pranit More Show Sejal Pawar Forced Leave : मुंबईतील केईएम रुग्णालयात एमबीबीएसचं शिक्षण घेणारी सेजल पवार हिला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. प्रणित मोरेच्या क्राऊड वर्क कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. तसंच, रुग्णालय प्रशासनाने तिच्या पालकांना समुपदेशनासाठीही बोलावले असून व्हायरल व्हिडिओप्रकरणी सविस्तर चौकशी करण्यासाठी पाच सदस्यी चौकशी समितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमामध्ये सेजल पवार हिने अवयवदान आणि मृतदेहासंबंधी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर समाजातील घटकांच्या भावना दुखावल्या गेल्या. यासंदर्भात १० जून रोजी ई-मेलद्वारे अनेक तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडे आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची दखल घेत तत्काळ वरिष्ठ प्राध्यापकांची प्राथमिक तथ्यशोधन समिती स्थापन केली. या समितीने संबंधित कार्यक्रमाचा संपूर्ण चित्रफितीचा आढावा घेतला असून विद्यार्थिनीशी संवाद साधला. तसंच, तिला रुग्णालय आवारात प्रवेश निषिद्धही करण्यात आला आहे.
पाच सदस्यीय समिती स्थापन करणार
स्वतंत्र आणि निष्पक्ष पुनरावलोकन सुनिश्चित करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या प्रस्तावित समितीमध्ये एक निवृत्त प्राध्यापक, तीन वरिष्ठ प्राध्यापक आणि एक पत्रकार यांचा बाह्य सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) हरीश एम. पाठक म्हणाले, “आज विद्यार्थिनीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून तिची सुरक्षा आणि मानसिक आरोग्याबाबतच्या चिंतेचाही विचार केला जात आहे. आम्ही तिला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे आणि पालकांना तिच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे. ती अजूनही तिचे वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने, तिच्यावरील सर्व कारवाई लागू नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जाईल.”
सेजल पवारने शुक्रवारी लेखी माफीनामा सादर केला होता, यामध्ये तिने कबूल केलं की तिची काही विधाने अयोग्य होती आणि त्यामुळे इतरांना त्रास झाला. रुग्णालयाच्या प्राथमिक चौकशीत तिची टिप्पणी आक्षेपार्ह आणि असंवेदनशील असल्याचं आढळलं होतं. तिचं वक्तव्य वैद्यकीय विद्यार्थ्याकडून अपेक्षित असणारी प्रतिष्ठा, सहानुभूती आणि व्यावसायिक जबाबदारीच्या मानकांनुसार नव्हतं. प्रणित मोरेच्या एका कॉमेडी शोमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला. एका क्लिपमध्ये, सेजल पवारने पुरुष मृतदेह (कॅडव्हर) दात्यांबद्दल असंवेदनशील टिप्पणी केली होती. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी याप्रकरणी मोरे, पवार आणि प्रेक्षकांमधील आणखी एक सदस्य हिमांशू जांग्रा यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आहे.
सेजलला मिळणार बाजू मांडण्याची संधी
डेटवर खर्च केलेल्या पैशांच्या बदल्यात शारीरिक जवळीक साधण्याबाबत टिप्पणी करणाऱ्या जांग्रा याला या वादामुळे आधीच आपली नोकरी गमवावी लागली आहे. प्रशासनाने सांगितलं की, सेजलला समितीसमोर तिची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. ही चौकशी समिती व्हायरल व्हिडिओमधील विधाने, प्राप्त झालेल्या तक्रारी, विद्यार्थिनीचे वर्तन, या घटनेशी संबंधित सोशल मीडियावरील हालचाली आणि संस्थेच्या प्रतिमेवर झालेला परिणाम यांची तपासणी करेल. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर समितीच्या चौकशीच्या अटी निश्चित केल्या जातील, ज्यानंतर चौकशी अधिकृतपणे सुरू होईल. “प्राथमिक मूल्यांकनादरम्यान काही तथ्ये समोर आली असली तरी, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी व्यापक आणि निष्पक्ष चौकशी आवश्यक मानली गेली”, असं पाठक यांनी सांगितलं.
