नागपूर : यंदाच्या पावसाळ्याची सर्वाधिक प्रतीक्षा असलेली बातमी अखेर गुरुवारी मिळाली. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) ४ जून रोजी केरळमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. नेहमीच्या तारखेच्या तुलनेत यंदा मोसमी पावसाचे आगमन तीन दिवस उशिराने झाले असले तरी आता त्याच्या पुढील प्रगतीसाठी वातावरण अनुकूल बनले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मोसमी पाऊस गोव्याच्या संपूर्ण भागात, महाराष्ट्राच्या काही भागांत तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.
मोसमी पाऊस अखेर दाखल
साधारणपणे नैर्ऋत्य मोसमी पाऊस १ जून रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होतो. मात्र यंदा समुद्रावरील आणि वातावरणातील काही बदलांमुळे त्याच्या आगमनाला काही दिवसांचा विलंब झाला. अखेर गुरुवारी आवश्यक हवामानविषयक निकष पूर्ण झाल्यानंतर हवामान विभागाने मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोसमी पावसाने अरबी समुद्रातील दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व भाग, मध्य अरबी समुद्रातील काही भाग, लक्षद्वीप बेटे, केरळ आणि माहेचा संपूर्ण प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडूचा काही भाग तसेच बंगालच्या उपसागरातील विस्तृत क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे दक्षिण भारतात पावसाळ्याची औपचारिक सुरुवात झाली आहे.
हवामान स्थिती बळकट
मोसमी पावसाच्याच्या आगमनासाठी आवश्यक असलेल्या हवामान स्थिती गेल्या दोन दिवसांत अधिक बळकट झाल्या. आग्नेय अरबी समुद्रावर संवहनी ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली. समुद्रसपाटीपासून सुमारे साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिमेकडील दमदार वारे सक्रिय झाले. खालच्या स्तरावरील या वाऱ्यांचा वेग ताशी २० ते २५ नॉट्स इतका नोंदविण्यात आला. त्याचबरोबर केरळमध्ये गेल्या दोन दिवसांत बहुतांश भागांत व्यापक पाऊस झाला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. या सर्व बाबी मान्सूनच्या आगमनासाठी आवश्यक मानल्या जातात.
मोसमी पावसाची प्रगती वेगाने
हवामान विभागाने जाहीर केलेल्या मोसमी पावसानच्या उत्तरेकडील सीमारेषेनुसार (नॉर्दर्न लिमिट ऑफ मॉन्सून) त्याची प्रगती आता वेगाने सुरू असून पुढील काही दिवसांत तो अरबी समुद्राच्या मध्य भागात आणखी पुढे सरकेल. गोव्याचा संपूर्ण प्रदेश मोसमी पावसाच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मोसमी पावसाच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण, स्थानिक पावसाच्या सरी आणि तापमानातील चढ-उतार अनुभवास येत आहेत. मोसमी पावसच्या प्रगतीचा वेग कायम राहिल्यास राज्यात लवकरच पावसाळ्याची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा
यंदा उष्णतेच्या लाटांचा कालावधी तुलनेने अधिक राहिल्यानंतर मोसमी पाऊस आगमन झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार असून पावसाच्या पुढील वाटचालीवर कृषी क्षेत्राचे लक्ष केंद्रित झाले आहे.
