Ketan Agarwal murder case update : लोणावळ्यातील लोहगडावर जाऊन केतन अग्रवाल याला दरीत ढकलून त्याची हत्या करण्यात आली. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. सध्या ते १४ दिवसाच्या कोठडीत आहेत. दरम्यान, चेतन चौधरीची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा त्याचे वकील अॅड. राधिकेश उत्तरवार यांनी केला आहे. तसंच त्याच्या अटकेबाबत अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत. याबाबत त्यांनी आज न्यायालयात दोन मुख्य अर्जही दाखल केले आहेत. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
“सध्याच्या प्रकरणात चेतनची अटक बेकायदेशीर घोषित करण्यात यावी, यासाठी आम्ही काल एक अर्ज दाखल केला होता. आम्ही हा अर्ज दोन कारणांवरून दाखल केला आहे. पहिले कारण म्हणजे पहिल्या पोलीस कोठडीदरम्यान (रिमांड) आम्ही चेतनला भेटू शकलो नाही किंवा त्याच्याकडून सूचना घेऊ शकलो नाही. परंतु, ३० तारखेला त्याला भेटल्यानंतर आम्ही त्याच्याकडून माहिती घेतली”, असं अॅड. राधिकेश उत्तरवार म्हणाले.
पहिला अर्ज कोणता?
“आम्हाला समजलं की, पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये दावा केल्याप्रमाणे चेतनला २३ जून रोजी दुपारी ४ वाजून ३०मिनिटांनी अटक करण्यात आली नव्हती. तर प्रत्यक्षात, त्याला एका साध्या वेशातील पोलिसाने रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आणले. दुपारी साडेबारा वाजता एफआयआर नोंदवण्यापूर्वी जी १२ तासांची अटक दाखवण्यात आली आहे, ती बेकायदेशीर आहे; आणि म्हणूनच या प्रकरणात चेतनची संपूर्ण अटक आणि कोठडी बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा अर्ज आम्ही दाखल केला आहे आणि न्यायालयीन मदतीची मागणी केली आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दुसरा अर्जही दाखल
“पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सादर करण्याचे आणि ते जतन करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, यासाठी आम्ही आणखी एक अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी निश्चित केली आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली.
