Ketan Aggarwal Murder Case investigation reveals shocking plans: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून त्यांनी हत्येची योजना कशी आखली, याबाबतचा नवीन तपशील समोर आला आहे. १८ जून रोजी सिया आणि चेतनने लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून केतनला ढकलले होते. त्यापूर्वी त्यांनी केतनला बाजूला सारण्यासाठी विविध पर्यायांचा विचार आणि अभ्यास केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

भाडोत्री मारेकरी आणि अपंगत्व

सिया आणि चेतनने केतनला मारण्याआधी भाडोत्री मारेकऱ्यांना सुपारी देऊन केतन अग्रवालला कायमचे अपंग करण्याचा विचार केला होता. तसेच लोहगड किल्ला निवडण्याआधी त्यांनी लोणावळ्यातील टायगर पॉइंट, विसापूर किल्ल्याची रेकी केली होती. तसेच विषप्रयोग करून केतनला संपवण्याचाही विचार केला होता. या मार्गातून आपण कसे वाचू शकतो, याचाही अभ्यास दोघांनी केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा केल्यानंतर आपण यात अडकू नये, यासाठी दोघांनी काही क्राइम थ्रिलर चित्रपटही पाहिले होते.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, लोहगड किल्ल्यावरून केतनला ढकलून मारण्याआधी सिया आणि चेतनने इतरही काही भागांची रेकी केली होती. त्यात लोणावळ्यातील टायगर पॉइंट, विसापूर किल्ल्याचा समावेश होता. लोहगड किल्ला अंतिम केल्यानंतर त्यांनी त्याचे काही फोटो एकमेकांना पाठवले होते. ३१ मे पूर्वी दोघांनी केतनला संपविण्यासाठी लोहगड किल्ला निश्चित केला.

भाडोत्री मारेकऱ्यांचा विचार पण…

सिया आणि चेतनने भाडोत्री मारेकऱ्यांकडून केतनची हत्या करण्याच्या पर्यायाचा विचार केला होता. मात्र त्यांनी कोणत्याही मारेकऱ्याशी संपर्क साधला नाही, असेही पोलिसांनी सांगितले. सिया आणि चेतनने इतर पर्यायांचा विचार कसा केला? किंवा लोहगडला त्यांनी अंतिम स्वरुप कसे दिले? याची माहिती मात्र पोलिसांनी दिली नाही.

केतनची हत्या करण्याची योजना कशी आखली?

केतनची हत्या करण्यापूर्वी सिया आणि चेतनने बरीच चर्चा केली. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, सिया आणि केतनने १८ जून पूर्वी ३१ मे आणि १४ जून रोजी लोहगडला भेट दिली होती. सियाने ४ जून रोजीही लोहगडला जाण्याची योजना आखली होती. मात्र कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे त्यांना जाता आले नाही.

केतनला ढकलण्याचा सराव केला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन आणि सियाने १८ जून पूर्वी लुल्ला नगर परिसरातील कॅफेमध्ये भेटून केतनला ढकलण्याचा सराव केला होता. पोलिसांनी सांगितले की, सिया आणि केतनचे प्री-वेडिंग फोटोशूट बाली येथे होणार होते, त्यापूर्वी सियाने त्याचा पासपोर्ट चोरून तो पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या फूड मॉलमधील प्रसाधनगृहात फेकला होता. असे करून तिला हे लग्न रद्द करायचे होते.

सिया आणि केतनचा १९ फेब्रुवारी रोजी साखरपुडा झाला होता. या वर्षात त्यांचे लग्न होणार होते. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सिया आणि चेतन चौधरीचे संबंध सुरू झाले होते.