मुंबई : लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) करण्याचे निर्देश विधानसभेचे तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी दिले. सुनील शेळके यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थितीत करीत विशेष तपास पथकाकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.

लोहगडावर झालेली केतन अग्रवाल याची हत्या मृताची वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिच्या प्रियकराकडून कट रचून झाली आहे. सिया आणि तिच्या प्रियकरांच्या संबंधांबाबत गोयल कुटुंबाला माहिती होती. गोयल कुटुंबाने ही सर्व माहिती लपवून ठेवली. त्यामुळे हत्या प्रकरणात गोयल कुटुबांला आरोपी करावे. त्यांची नेमकी काय भूमिका होती. हत्येचा कट कसा रचला गेला, याचा सखोल तपास होण्याची गरज आहे. हा तपास विशेष तपास पथकाच्या माध्यमातून करावा, अशी मागणी शेळके यांनी केली होती. या मागणीची दखल घेत तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हत्येचा तपास विशेष पथकाकडून करण्याचे निर्देश दिले.

तालिका अध्यक्षांना निर्देश देण्याचे अधिकार आहेत का ?

विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तालिका अध्यक्ष किंवा विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, तालिका सभापतींना सरकारला अथवा प्रशासनाला दिशानिर्देश देण्याचे अधिकार आहेत का ? या बाबत खुलासा होण्याची गरज आहे. विधान परिषदेत एका प्रकरणात उपसभापतींनी दिलेले निर्देश सभापतींनी मागे घेतले. शिवाय मुख्यमंत्र्यांनी असे निर्देश सरकार अथवा प्रशासनाला देण्याचे अधिकार नाहीत. सरकारच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, असे विधान केले होते. वास्तविक तसे अधिकार आहेत, आजवर त्या अधिकारांचा वापर केला गेला आहे. पण, एका अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधी मंडळाचे अधिकार कमी केले आहेत. त्यामुळे आता तालिका अध्यक्षांना निर्देश देण्याचे अधिकार आहेत की, नाही याचा खुलासा करावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. या मागणीला सुधीर मुनगंटीवार यांनी दुजोरा दिला. त्यांनंतर या बाबतचा निर्णय अध्यक्ष राहूल नार्वेकर जाहीर करतील, असे सांगितले.