Ketan Agarwal father Vishal Agarwal slams Siya Goyal parents: केतन अग्रवाल याच्या हत्येला आज एक महिना होत आहे. १८ जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. महिन्याभरात या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाले असून अजूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान अग्रवाल कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला. केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर विशाल अग्रवाल यांच्या वडिलांचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर आज विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

पत्रकार परिषदेत त्यांनी केतनच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच हे लग्न कुणी जमवले होते? लग्न जमल्यानंतर केतन आणि सियाचे संबंध कसे होते? केतन याबाबत काय सांगायचा? याचीही माहिती विशाल अग्रवाल यांनी दिली.

दरम्यान सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल हे सिया दोषी असेल तर तिला फाशी द्या, असे सांगत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सियाला वकील पुरवला जात आहे. प्रसंगी वकील बदलतही आहेत. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे का? असा प्रश्न विशाल अग्रवाल यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी म्हटले, “ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. ते एकाबाजूला तिला दोषी म्हणतात, दुसऱ्या बाजूला तिला मदतही करत आहेत.”

सियाबद्दल केतन काय सांगायचा?

केतनने तुम्हाला सियाच्या वर्तनाबाबत काही सांगितले होते का? असा प्रश्न विशाल अग्रवाल यांना माध्यमांनी विचारला. यावर ते म्हणाले, सियाबरोबर भांडण झाले, असे कधी केतनने सांगितले नव्हते. पण ती कधी कधी खूप नाराज होते किंवा चिडते. तिचा फोन नेहमी एंगेज असतो, असे तो म्हणायचा. पण मुलांचे काही प्रश्न असतील म्हणून आम्ही याकडे दुर्लक्ष केले. केतनचीही आम्ही समजूत घालून त्याला शांत राहायला सांगायचो.”

आम्ही सून आणत होतो, पण…

विशाल अग्रवाल पत्रकार परिषदेत भावुक झालेले पाहायला मिळाले. ते म्हणाले, आम्ही आमच्या घरासाठी सून आणि मुलासाठी चांगली पत्नी आणण्याचा प्रयत्न केला. पण आमच्याबरोबर जे झाले, ते कुठल्याही बापाबरोबर होऊ नये, अशी माझी प्रार्थना आहे. सियाने आम्हाला स्पष्ट ‘नाही’ म्हणून सांगितले असते तर हा प्रसंगच उद्भवला नसता.

केतनच्या आठवणी सांगताना विशाल अग्रवाल यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, आजच्या जगात कुणीही कुणावर लग्नासाठी दबाव टाकू शकत नाही. माझा मुलगा २६ वर्षांचा होता. मी त्याचे शिक्षण केले, त्याला लहानाचा मोठा केला. तो आमच्या म्हातारपणात आमचा सांभाळ करेल, हे स्वप्न पाहिले. पण त्याच्याच तिर्डीला खांदा देण्याची दुर्दैवी वेळ माझ्यावर आली. कुणाही बापाबरोबर हे होऊ नये.

“माझे सर्व समाजाला आवाहन आहे की, माझा मुलगा गेला. पण आणखी एखादा केतन जाऊ नये. यासाठी सर्व आई-वडिलांनी सजग राहावे”, असेही विशाल अग्रवाल म्हणाले.

सियाचे वडील FDA च्या कारवाईवर काय म्हणाले होते? पाहा व्हिडीओ

मुलगा आणि वडीलही गमावले

विशाल अग्रवाल म्हणाले की, मी माझा मुलगा तर गमावलाच पण वडिलांचे निधन झाले आहे. ज्या वडिलांनी मला बोटाला धरून लहानाचे मोठे केले. मला शिक्षण देऊन पायावर उभे केले, ते आज नाहीत. तसेच मी ज्याला लहानाचा मोठा केला त्या मुलालाही मी गमावले. मला एकच मुलगा होता. तोही गेला. मी जिवंत आहे, तोपर्यंत हे दुःख आमच्याबरोबर आहे.

लग्न जमवणारे मध्यस्थही जबाबदार

सिया आणि केतनचे लग्न कसे ठरवले, याबाबतही विशाल अग्रवाल यांनी माहिती दिली. हे लग्न माझे सख्खे चुलत मामा आणि मामींनी ठरवले होते. ते दोघेही लग्नासाठी मध्यस्थी होते. त्यांनी आम्हाला या स्थळाबाबत पूर्ण खात्री दिली होती. सियाला लहानपणापासून आम्ही सांभाळले आहे. तसेच केतनलाही आम्ही लहानाचा मोठा होताना पाहिले. त्यांनी आम्हाला इतकी खात्री दिली की, आम्ही लग्नासाठी तयार झालो.

मध्यस्थी करणाऱ्या नातेवाईकांना सियाच्या पार्श्वभूमीबाबत काही माहिती होती का? असा प्रश्न विचारला असता विशाल अग्रवाल म्हणाले की, आज जी परिस्थिती समोर आली आहे, त्यानुसार त्यांना मुलीबाबत सर्व माहिती होती आणि ती त्यांनी आमच्यापासून लपवली, असे वाटत आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, याबाबत तपास होईल, असे मनोमन वाटते.