लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आलेले केतन अग्रवाल हत्या प्रकरण एका भीषण कटाचा भाग असल्याचे उघडकीस आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात दाखल केलेल्या तब्बल ५,००० पानांच्या दोषारोपपत्रात या थंड डोक्याने रचलेल्या थरारक कटाचा संपूर्ण पट मांडला आहे. महिन्‍यान्‌महिन्‍यांचे नियोजन, बनावट इन्स्टाग्राम अकाउंट, इंटरनेटवर केलेला शोध आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न… या हत्येचा प्रत्येक धागादोरा पोलिसांनी समोर आणला आहे. या संदर्भातील वृत्त ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

५,००० पानांचे दोषारोपपत्र; पोलिसांचे न्यायालयात भक्कम पुरावे

वडगाव मावळ न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार, २६ वर्षीय केतन अग्रवाल याची १८ जून रोजी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन बाबूलाल चौधरी यांनी मिळून पूर्वनियोजित कट रचून हत्या केली. या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स, व्हॉट्सॲप चॅट्स आणि फॉरेन्सिक डिजिटल पुराव्यांचा मोठा डोंगर उभा केला आहे. लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या एका खोल दरीजवळ केतनच्या आयुष्याचा शेवटचा क्षण कसा घडवून आणला गेला, याचा उलगडा पोलिसांच्या तपासातून झाला आहे.

चेतनचा धक्का अन् सियाची लाथ: हत्येचा थरारक घटनाक्रम

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार:

केतन आणि सिया सकाळी ९ वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. त्याच वेळी संशयित आरोपी चेतन चौधरी निळ्या रंगाच्या ज्युपिटर दुचाकीवरून तेथे आला. खाकी हुडी, काळी हाफ पँट, हेडफोन्स आणि पाठीवर बॅग अशा वेषात आलेल्या चेतनने दुसरा मार्ग धरला आणि योग्य वेळेची वाट पाहत पुढे निघून गेला. तिकीट काउंटरजवळ सियाने इशारा करताच चेतन किल्ल्याच्या दिशेने वेगाने पुढे निघून गेला. सिया मात्र केतनशी गोड बोलून त्याला आधीच ठरवलेल्या दरीजवळील पॉइंटकडे घेऊन गेली. केतन दरीच्या कड्यावर उभा राहून खाली पाहत असताना मागून चेतनने त्याला जोरदार धक्का दिला, तर त्याच क्षणी सियाने त्याच्या पायावर लाथ मारली. या दुहेरी हल्ल्यामुळे केतनचा तोल गेला आणि तो थेट शेकडो फूट खोल दरीत कोसळला.

सुपारी किलरपासून लोहगडची निवड ‘असा’ शिजला कट

केतन आणि सिया यांचा साखरपुडा १९ फेब्रुवारी रोजी झाला होता. मात्र, सिया या नात्यावर खूश नव्हती आणि तिचे चेतनशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांनी केतनला वाटेतून हटवण्यासाठी विविध मार्गांचा शोध सुरू केला.

  • सुपारी किलरचा शोध: ५ मे रोजी चेतन आणि त्यांचा साथीदार रितेश संजय हांगे यांनी बंगळुरूहून शूटर मागवण्यासाठी शार्व अंकुल घोलप नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला होता. मात्र, त्याने नकार दिल्याने हा प्लॅन फ्लॉप झाला.
  • लोहगडची रेकी: यानंतर त्यांनी लोणावळा परिसरातील विविध ठिकाणांची पाहणी सुरू केली. २८ आणि २९ मे रोजी त्यांनी लोहगड किल्ल्याची रेकी केली. यापूर्वी लोहगडवर एका अपघाती मृत्यूची नोंद असल्याने, केतनच्या हत्येलाही ‘ट्रेकिंग अपघात’ दाखवणे सोपे जाईल म्हणून या जागेची निवड करण्यात आली.

Google सर्च आणि सायबर तपासातील धक्कादायक खुलासे

संशयितांच्या मोबाईल आणि डिजिटल उपकरणांच्या फॉरेन्सिक तपासात गुन्ह्याचा इरादा स्पष्ट करणारे सर्च हिस्टरीचे पुरावे मिळाले आहेत:

"Easy way to kill someone"
"Death Cap Mushroom India"
"How to Manipulate People"
"How to Delete Google Account"
"How to format iPhone No History on calls"
"Trekking Incident"
"Lohagad Fort"
"Sonam Case"

याशिवाय, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी “How to Manipulate People” नावाचे पॉडकास्ट ऐकत असत आणि पोलिसांची दिशाभूल कशी करायची यावर चर्चा करत असत.

‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट आणि ‘ट्रॅप’

केतनला लोहगडवर आणण्यासाठी सियाने ‘Mahi’ नावाचे एक बनावट इन्स्टाग्राम अकाउंट वापरले. हे अकाउंट सियाच्या मैत्रिणीचे असल्याचे भासवले गेले.

या अकाउंटवरून चॅटिंग करून केतनला convince करण्यात आले की, १९ जून रोजी असणाऱ्या सियाच्या वाढदिवसापूर्वी १८ जून रोजी तिला सरप्राईज म्हणून लोहगडवर ट्रेकिंगला घेऊन जा. घटना घडल्यानंतर हे अकाउंट डिलीट करण्यात आले होते, परंतु सायबर पोलिसांनी फॉरेन्सिक विश्लेषणाद्वारे ते रिकव्हर केले.

हत्या केल्यानंतर Google/YouTube सर्च हिस्टरी, व्हॉट्सॲप चॅट्स, आयक्लॉड डेटा आणि कॉल लॉग्स डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. चेतनने आपले लोकेशन लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल वापरला होता.

पर्यटकांचे फोटो अन् प्रत्यक्षदर्शींची साक्ष ठरली महत्त्वाचा दुवा

या संपूर्ण खटल्यात पोलिसांची बाजू भक्कम करण्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि छायाचित्रे महत्त्वाची ठरली आहेत.

  • प्रत्यक्षदर्शीची साक्ष: घटना घडताना प्रत्यक्ष पाहणाऱ्या एका साक्षीदाराचा जबाब दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे.
  • पर्यटकांच्या कॅमेऱ्यातील फोटो: घटनेच्या दिवशी लोहगडवर आलेल्या इतर पर्यटकांच्या फोटोंच्या बॅकग्राऊंडमध्ये केतन, सिया आणि चेतन हे तिघेही एकत्र कैद झाले होते. यामुळे तिघेही एकाच वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे सिद्ध झाले.

पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधात हत्या (BNS/IPC), गुन्हेगारी कट रचणे, पुरावे नष्ट करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) विविध कलमांखाली दोषारोपपत्र दाखल केले असून न्यायालयीन सुनावणीदरम्यान पुढील चित्र स्पष्ट होईल.