Ketan Agarwal Stammering Video viral update : टक्कल असल्याने वापरत असलेला केसांचा विग आणि बोलण्यातील अडखळतेपणा या कारणांमुळे केतन नापसंत असल्याचा दावा सिया गोयल हिने केल्याची माहिती तपासामध्ये उघड झाली. मात्र, याबाबत सियाच्या कुटुंबियांना आधीच कल्पना दिली होती, असा दावा केतनच्या पालकांनी केलाय. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात केतन न अडखळता बोलताना दिसत आहे.

पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा केतन आणि मार्केट यार्डातील मसाले विक्रीचे व्यापारी प्रवीण गोयल यांची मुलगी सिया यांचा साखरपुडा झाला होता. तत्पूर्वी केतनच्या वडिलांनी मुलाला टक्कल असून, तो विग वापरत असल्याची माहिती सियाच्या कुटुंबाला दिल्याचे सांगितले होते. केतन बोलताना अडखळत होता. तसेच त्याला केसांचा विग असल्याचा दावा सियाने केला. मात्र, लग्न मोडून कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी तिने यासंदर्भात वाच्यता केली नाही. सियाला केतनसोबत लग्न करणे मान्य नसल्यामुळे तिने आरोपी चेतन चौधरीच्या मदतीने लोहगडावरून ढकलून देत १८ जून रोजी केतनचा खून केला.

नव्या व्हिडिओमध्ये काय?

मुंबईतील ‘व्ही थिंक हॉस्पिटॅलिटी’ (V Think Hospitality) या वेडिंग आणि इव्हेंट प्लॅनर कंपनीने यासंर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. एका लग्न कार्यातील हा व्हिडिओ असल्याचं केतनच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे. “आम्ही गेल्या चार महिन्यांपासून या लग्नाचे नियोजन करत आहोत… व्ही थिंकने प्रत्येक टप्प्यावर आम्हाला साथ दिली आहे, प्रत्येक क्रिएटिव्ह काम, प्रत्येक नवीन आणि वेगळी गोष्ट व्ही थिंक हॉस्पिटॅलिटीने केली आहे.” या प्रमोशनल व्हिडिओच्या शेवटी केतन म्हणाला, “तुम्ही हायर करू शकता अशी ही सर्वात सर्वोत्तम इव्हेंट टीम आहे”, असं केतन न अडखळता बोलताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

“या कुटुंबाचा एक भाग असण्याचे भाग्य ‘थिंक हॉस्पिटॅलिटी’ला लाभले. आज, आम्ही आमच्या भावाच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत आहोत. केतन हा अत्यंत दुर्मिळ आणि निर्मळ आत्म्यांपैकी एक होता. तो दयाळू, प्रामाणिक, नम्र आणि इतरांसाठी नेहमी तत्पर राहणारा होता. त्याचे आयुष्य मोलाचं होतं आणि त्याच्या अनुपस्थितीतही त्याचा आवाज ऐकला गेला पाहिजे. सत्य आणि न्यायाच्या या लढ्यात आम्ही त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आम्ही त्याची स्मृती कधीही पुसू देणार नाही आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. केतन, तुझी आठवण नेहमीच आमच्या हृदयात राहील”, अशी पोस्ट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने केली आहे.