Ketan Agrawal Murder Case Lohagad Fort Update: केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात ५,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर २६ वर्षीय केतन अग्रवालची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यांनी हा गुन्हा कसा केला? त्यासाठी काय तयारी केली होती? प्रत्यक्ष साक्षीदारांना कसे धमकावले? याची माहिती आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे. दरम्यान केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणी लिंगभेदाचा विषय उपस्थित करून नाराजी व्यक्त केली आहे.
न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र सादर केल्यानंतर आता केतनची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. फास्ट ट्रॅक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी व्हावी. तसेच सियाच्या नातेवाईकांनी साक्षीदारांना फोडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आरोपींना शिक्षा मिळावी, असेही ते म्हणाले. न्यायाची अपेक्षा करतानाच त्यांनी समाजातील लिंगआधारित दुटप्पीपणावर नाराजी व्यक्त केली.
टिव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना विशाल अग्रवाल म्हणाले की, आपण स्त्री-पुरुष समानतेबाबत बोलतो. पण समाज त्याबाबत फारसा आग्रही दिसत नाही. माझा मुलगा केतनच्याऐवजी एखाद्या महिलेचा इतक्या निर्घृण पद्धतीने हत्या केली गेली असती तर आरोपीच्या पूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकले असते. पण या प्रकरणात असे काहीही झाले नाही. माझा मुलगा पुरुष होता, म्हणून त्याच्या जीवाची काही किंमत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही समान न्याय असायला हवा. केतनची हत्या झाल्यानंतर एकही सामाजिक संघटना पुढे आली नाही. कुणीही आंदोलन, उपोषण वगैरे किंवा मागणी केली नाही. माझा मुलगा पुरुष आहे, म्हणून ही उदासीनता आहे का? तो जर स्त्री असता तर कितीतरी लोक पुढे आले असते. न्यायाची मागणी केली असती”, असेही विशाल अग्रवाल म्हणाले.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विशाल अग्रवाल यांनी आणखी एक आरोप केला. ते म्हणाले, केतनची हत्या होण्यापूर्वी त्याने सियाचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा केला होता. तिला वाढदिवसाची भेट देण्यासाठी त्याने पाठीवर तिच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला होता.
१८ जून रोजी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून ढकलले होते. पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे, सिया आणि चेतन यांनी एका बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटचा वापर करून केतनला लोहगड किल्ल्यावर येण्यासाठी प्रवृत्त केले होते.
