scorecardresearch

केतकी चितळेविरोधात साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांची पोलिसांत तक्रार

सध्या भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये एका ट्विटवरुन शाब्दिक युद्ध सुरू असून यामध्ये केतकी चितळेने उडी घेत शरद पवारांवर टीका केली.

Ketki Chitale
पोलिसांना दिले निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. यासंदर्भात महिला आघाडीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देखमुख यांनी पोलीस अधीक्षकांसाठी सातारा शहर पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.

सध्या भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये एका ट्विटवरुन शाब्दिक युद्ध सुरू असून यामध्ये केतकी चितळेने उडी घेत शरद पवार यांच्यावर कवितेच्या माध्यमातून विकृत विडंबन केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा समिंद्रा जाधव व युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देखमुख यांनी केतकी चितळेविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या या निवेदनात म्हटले की, “केतकी चितळेने आपल्या ट्विटर व फेसबुक पेजवर एक कविता पोस्ट केली आहे. देशाचे नेते शरद पवार साहेब यांची राजकारण, समाजकारणात लोकनेते म्हणून उभी हयात गेली आहे. महाराष्ट्राला विविध क्षेत्रात गती देऊन लोकविकासाचे त्यांनी सातत्याने काम केले आहे. महाराष्ट्रात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. अशा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचे केतकी चितळे यांनी कवितेतून विकृत विडंबन केले आहे. या त्यांच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येणार आहे. अशा प्रवृत्ती समाजासाठी घातक आहेत.”

केतकीवर साताऱ्यामध्येही गुन्हा दाखल करावा व अशा प्रवृत्तींना आळा बसवावा, असे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी समिंद्रा जाधव यांच्यासह कुसुम भोसले, उषा पाटील, डॉ. सुनिता शिंदे, रशिदा शेख, स्मिता देशमुख, नलिनी जाधव, नुपुर नारनवर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ketki chitale issue ncp womens demand a case against actress in satara scsg