जळगाव महापालिका निवडणूक
महापालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना आणि आ. सुरेश जैन यांची तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता दिसत नसताना त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत राष्ट्रवादी व भाजपने पालिका निवडणूक एकत्र येऊन लढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
पालिका निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना व आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. त्यास अनुसरून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तत्कालीन पालिकेत व आताच्या महापालिकेतही सुमारे तीन दशकांपासून आ. जैन यांच्याच नेतृत्वातील गटाची सत्ता आहे. महापालिकेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला सत्ता मिळविता आली नाही. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने दुसरे स्थान मिळविले. तर, भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता.
सद्यस्थितीत महापालिका कोटय़वधींच्या घोटाळ्यांमुळे चर्चेत आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणारे आ. जैन यांच्यासह त्यांचे समर्थक माजी महापौर प्रदीप रायसोनी हे घरकुल घोटाळाप्रकरणी कारागृहात आहेत. याशिवाय बरेच आजी-माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष व माजी महापौर त्यात संशयित आरोपी असून त्यांच्यावर नुकतेच दोषारोप निश्चित झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर दोन महिन्यांनी महापालिकेची निवडणूक होत असल्याने सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील खान्देश विकास आघाडी, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व समाजवादीसारखे पक्षतयारीला लागले आहेत. सर्वानी स्वबळावर लढण्याची तयारी केली असली तरी सत्ताधारी आघाडीच्या विरोधात महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पालकमंत्री गुलाब देवकर आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी त्यासाठी प्राथमिक तयारी सुरू केली असून भाजप आणि राष्ट्रवादी मिळून एकत्रितरीत्या लढण्याची त्यांची तयारी झाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष मनोज चौधरी यांनी दिली. २००८ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने १४ तर भाजपने दहा जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीचे काही उमेदवार थोडय़ा फरकाने पराभूत झाले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. खडसे व देवकर यांच्यातील सख्य आणि खडसे व जैन यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे. त्यामुळेच भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यास नवल वाटावयास नको, अशी चर्चा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
महापालिकेच्या ७५ जागांबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा करून त्यात कोणी किती जागा लढवाव्यात याबाबत प्राथमिक मतैक्य झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, राष्ट्रवादीचे खा. ईश्वरलाल जैन यांचे सुरेश जैन यांच्याशी सख्य असले तरी राष्ट्रवादीत त्यांना मानणारा एक गट आहे. त्यामुळे सुरेश जैन यांना अडचणीत आणणारी आघाडी ते निर्माण करू देतील काय, असाही प्रश्न आहे.

२००८ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने १४ तर भाजपने दहा जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीचे काही उमेदवार थोडय़ा फरकाने पराभूत झाले होते. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. खडसे व देवकर यांच्यातील सख्य आणि खडसे व जैन यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे.