अलिबाग– जन्मदात्या आईने आपल्या दोन मुलांसह इमारतीवरून उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यात समोर आली आहे. कर्जवसूलीच्या तगाद्याला कंटाळून ही आत्महत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिरानंदानी फॉर्च्यून सिटी मध्ये ही घटना घडली. मच्छींद्र फोफेरे हे त्यांच्या पत्नी व मुलांसह राहत होते. त्यांनी विश्वनाथ देसाई यांच्याकडून दोन लाखांची रक्कम उसनी घेतली होती. मात्र काही कारणामुळे ते ती रक्कम फेडू शकले नव्हते. त्यामुळे विश्वनाथ देसाई आणि त्यांच्या पत्नी यांनी कर्जवसूलीसाठी तगादा लावला होता.

सलग सात दिवस ते उसनी रक्कम वसूलीसाठी फोन करत होते. सोमवारी संध्याकाळी विश्वनाथ देसाई आणि त्यांची पत्नी कर्जवसूलीसाठी फोफेरे कुटूंबियांच्या घरी आहे, यावेळी दोघांनी फोफेरे कुटूंबियांना धमकावत शिविगाळी केली. याचा धसका मानसी फोफेरे यांनी प्रचंड धसका घेतला. याच धसक्यातून मंगळवारी मानसी फोफेरे यांनी आपल्या ११ वर्षाचा मुलगा आणि ६ वर्षाच्या मुलीसह इमारतीवरून खाली उडी मारत आत्महत्या केली.

घटनेनंतर तिघांनाही नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिघांचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या घटनेमुळे खालापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात विश्वनाथ देसाई आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान कर्जवसूलीसाठी तगादा लावणारे विश्वनाथ देसाई आणि त्यांची फरार आहेत. पोलीस दोघांचा शोध घेत आहे.

या निमित्ताने सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. खाजगी व्यक्तीकडून वाढीव व्याजदराने कर्ज घेऊ नका असे आवाहन पोलीसांनी केले आहे. अनधिकृतपणे वाढीव व्याजदराने कोणी कर्ज देत असेल तर त्याची माहिती पोलीसांना द्यावी असे आवाहनही पोलीसांनी केले आहे.