मुंबई : मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परतीच्या प्रवासात राज्यात काही ठिकाणी पाऊस पडत असला तरीही खरीप हंगामातील वाळून गेलेल्या पिकांना त्याचा फायदा होणार नाही. पिकेच करपून गेल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांहून कमी होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. कृषी विभाग पहिला अधिकृत अंदाज सप्टेंबरअखेर जाहीर करणार आहे. परतीचा पाऊस चांगला झाल्यास तूर आणि कापूस पिकाला काहीसा दिलासा मिळू शकतो.
राज्यात सरासरीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामातील पेरण्यांमध्ये ५ ते ७ टक्क्यांची घट झाली आहे. एकूण सुमारे १ कोटी ३९ लाख ६ हजार ७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापैकी सोयाबीन मुख्य पीक असून, ४९ लाख ६३ हजार ९३३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. अपवाद वगळता राज्यातील सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणीही सरासरी इतके सोयाबीन उत्पादन होण्याची शक्यता नाही. गत काही वर्षांपासून राज्यात सरासरी १०० लाख टन सोयाबीन उत्पादन होते, यंदा त्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल मूग, उदीड या कमी काळातील पिकांची पेरणी होते. पण, पावसाअभावी कडधान्य पिके जळून गेली आहेत. उर्वरीत खरीप ज्वारी, बाजरी, रागी, वरई, आदी तृणधान्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
किनारपट्टीवर भाताच्या पिकाला फटका
राज्यात कोकण किनारपट्टीसह सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, विदर्भात भाताची शेती होते. यंदा सरासरी १३ कोटी ९७ लाख ७०६ हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. पण, तळकोकणासह सह्याद्री आणि विदर्भातही पावसाने ओढ दिल्यामुळे भाताच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पूर्व विदर्भात पावसाची स्थिती बरी असली तरीही भाताचे अपेक्षित उत्पादन होण्याची शक्यता नाही. त्यामुळे किनारपट्टीपासून, विदर्भापर्यंत भात पिकाला फटका बसला आहे.
परतीच्या पावसाचा तूर, कापसाला दिलासा
मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यात सोमवारपासून काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. वाळून गेलेल्या पिकांना फायदा होणार नसला तरीही उशिराने काढणी होणाऱ्या तूर आणि कापूस पिकाला काहीसा दिलासा मिळू शकतो. हंगामात तुरीची सुमारे १२ लाख तर कापसाची ३८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. तूर, कापसाची लागवड प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात होते. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी तूर, कापसाचे पीक जीवंत असले तरच परतीचा पावसाचा काहीसा फायदा होऊ शकतो. पण, वाढीवर परिणाम झाल्यामुळे सरासरी इतक्या उत्पादनाची अपेक्षा नाही.
सप्टेंबरअखेर पहिला अंदाज जाहीर करू
राज्याच्या बहुतांश भागातील पिके पावसाअभावी वाळून गेली आहेत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी स्थिती बरी आहे. त्यामुळे खरीप हंगामातील एकूण पीक उत्पादनात मोठी घट होणार आहे. कृषी विभाग सप्टेंबरअखेर अधिकृत पहिला अंदाज जाहीर करेल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
