मुंबई : नैसर्गिक वायूच्या टंचाईमुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा देशाच्या युरिया उत्पादनात ४.३ टक्क्यांनी घट झाली आहे. फक्त मार्च महिन्याचा विचार करता युरिया उत्पादनात २९.१ टक्क्यांनी घट झाली आहे. म्युरेट ऑफ पोटॅशची (एमओपी) शंभर टक्के आयात केली जाते. एमओपीच्या आयातीत १७.३ टक्क्यांनी घट झाली आहे. अन्य खतांचे उत्पादन आणि आयातीची स्थिती यापेक्षा वेगळी नसल्यामुळे आगामी खरीप हंगामावरील खत टंचाईचे सावट आणखी गडद झाले आहे.
द फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाने (एफएआय) दिलेल्या माहितीनुसार युरिया निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक वायूची टंचाई आणि प्रामुख्याने युरिया उत्पादक आखाती देशांमधील उत्पादन विस्कळीत झाल्यामुळे युरियाच्या उत्पादन आणि आयातीत घट झाली आहे. गतवर्षी (एप्रिल ते मार्च) ३ कोटी ६ लाख ४० हजार टन युरिया उत्पादन झाले होते, चालू वर्षी २ कोटी ९३ लाख १६ हजार टन उत्पादन झाले आहे. फक्त मार्च महिन्याचा विचार करता गतवर्षी मार्च महिन्यात २४.७० लाख टन युरिया उत्पादन झाले होते, चालू वर्षी १७.५१ लाख टन उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४.३ टक्क्यांनी तर मार्च महिन्याचा विचार करता २९.१ टक्क्यांनी उत्पादनात घट झाली आहे.
म्युरेट ऑफ पोटॅश (एमओपी) देशात उत्पादीत होत नाही, एमओपीची शंभर टक्के आयात होते. गतवर्षी एमओपीची आयात ३५.४१ लाख टन आयात झाली होती, यंदा २९.२९ लाख टन आयात झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत एमओपीची आयात १७.३ टक्क्यांनी घटली आहे. गतवर्षी मार्चमध्ये ६३,००० टन आयात झाली होती, यंदाच्या मार्चमध्ये १२,८०० टन आयात झाली आहे. चीन आणि रशिया जगातील प्रमुख रासायनिक खते आणि खतांसाठीच्या कच्च्या मालाचे निर्यातदार आहेत. सागरी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे रशियातून होणारी खतांची आयात थंडावली आहे. चीनने देशातील शेतीला प्राधान्य देऊन खत निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीनमधून होणारी सर्व प्रकारच्या खत आयात बंद आहे.
युरिया टंचाई का आणि निकड किती
देशात एका वर्षाला सुमारे ६०० लाख टन रासायनिक खतांची गरज असते. त्यापैकी ५० ते ५६ लाख टन म्हणजे ३०० लाख टन युरियाची गरज भासते. चांगला पाऊस झाल्यास पेरणी क्षेत्रात वाढ होऊन खतांची मागणी वाढते. देशात एका आठवड्याला सरासरी ५.४० लाख टन युरिया उत्पादन होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २.५६ लाख टन उत्पादन झाले आहे. युरिया उत्पादन प्रकल्पांना अद्यापही पूर्ण क्षमतेने नैसर्गिक वायूचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पूर्ण क्षमतेने युरिया उत्पादन होत नाही. युरिया उत्पादन आणि निर्यातीत इराण, सौदी अरेबिया, कतार, ओमान, युएई, बहरीन आघाडीवरील देश आहेत. आखाती युद्धामुळे या देशांचे उत्पादन आणि निर्यात विस्कळीत झाली आहे. युद्धजन्य स्थितीमुळे देशनिहाय युरियाच्या दरात ५० ते ९० टक्के आणि डीएपीच्या दरात ३० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या किंमतींमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवरील आर्थिक भार वाढत आहे.
खरीप हंगामाच्या पहिल्या टप्प्यासाठी अपेक्षित खत साठा
मोसमी पाऊस दमदार झाल्यास खतांच्या मागणीत वाढ होऊन टंचाईची स्थिती निर्माण होईल. पण, केंद्र सरकारने कोणत्या पिकांची कोणत्या जिल्ह्यांत पेरणी झाली आहे, ते पाहून गरज असलेले खत उपलब्ध करून दिले पाहिजे. पीकनिहाय खतांची गरज वेगळी असते, युरियाची गरज सर्वच पिकांना असत नाही. खरीप हंगामाच्या पहिल्या टप्प्यासाठी अपेक्षित खत साठा आहे, अशी माहिती रासायनिक खत उद्योगाचे अभ्यासक विजयराव पाटील यांनी दिली.
