सांगली : नाथबाबाच्या नावानं चांगभलच्या गजरात सोमवारी खरसुंडी (ता. आटपाडी) येथे जोगेश्‍वर विवाहानिमित्त सासनकाठी व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सांगली, सातार्‍यासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातील भाविकांनी हजेरी लावली.  ४१ अंश सेल्सियस तपमान असतानाही भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते.गुलालाच्या लालभडक रंगात न्हालेल्या आणि खोबर्‍याच्या उधळणीत नटलेल्या या चैत्र यात्रेतील सासनकाठी व श्रीनाथ व जोगेश्‍वरी विवाह सोहळ्यासाठी सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली.  

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री सिद्धनाथांच्या भेटीसाठी खरसुंडी नगरी अक्षरश। फुलून गेली होती. सिद्धनाथ-जोगेश्वरी विवाहसोहळ्याच्या निमित्ताने निघालेली पालखी म्हणजे भक्तीचा महासागर ठरला. पहाटे अभिषेक, त्यानंतर श्रींची राजेशाही वेशभूषा-भरजरी फेटा, अंगरखा, हातात तलवार-तर जोगेडरी देवीची लाल साडी व अलंकारांनी सजलेली रूपमाधुरी, भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.

गावोगावच्या सासनकाठ्या जेव्हा मुख्य मंदिरात दाखल झाल्या, तेव्हा पारंपरिक वाद्याच्या तालावर त्या नाचू लागल्या. प्रत्येक काठीसोबत असणारी श्रद्धा, परंपरा आणि मानाचा गौरव यांचा संगम त्या क्षणी अनुभवायला मिळत होता. गुलालाच्या उधळणीत आणि चांगभलं’च्या गर्जनेत वातावरण अक्षरश। रंगून गेले होते.

दुपारी मानकर्‍यांच्या सन्मानपूर्वक आगमनानंतर पालखी सोहळ्याची भव्य सुरुवात झाली. धूपारती, भालदार, चोपदार, सेवेकरी यांच्या शाही लवाजम्यातून निघालेली पालखी जेव्हा मुख्य पेठेत पोहोचली, तेव्हा भक्तांच्या आनंदाला उधाण आले.

या सोहळ्यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि हृदयस्पर्शी क्षण म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन. धावडवाडीचे मुस्लिम आणि विठलापूरचे हिंदू मानकरी एकत्र येऊन नैवेद्य अर्पण करताना दिसले. ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी आहे.

पालखी जोगेडरी मंदिरात पोहोचून पारंपरिक विधी पूर्ण करून पुन्हा मुख्य मंदिराकडे परतली, तेव्हा नाथबाबांच्या नावानं चांगभल’चा गजर अधिकच दुमदुमला. अखेर श्रीफळ वाढवून सोहळ्याची सांगता झाली.

  यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन, सेवेकरी आणि सेवाभावी संस्थांनी घेतलेले परिश्रमही तितकेच मोलाचे ठरले. अन्नदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि अतिरिक्त बससेवा यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला.