दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील खेड-खोपी-धामणंद या महत्त्वाच्या मार्गावर शनिवारी पहाटे भीषण भूस्खलन झाले. कासई शिंदेवाडी येथे डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळल्याने रस्त्याचा काही भाग खचून वाहून गेला असून, या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंगराचा कडा अचानक कोसळला. माती, दगड आणि झाडांचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने काही क्षणांतच संपूर्ण मार्ग बंद झाला. त्याचवेळी रस्त्याच्या कडेलाही तडे जाऊन काही भाग वाहून गेल्याने या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे.
दरड कोसळली, त्यावेळी घटनास्थळी कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, घटनेनंतर मार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागले.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन, पोलीस आणि स्थानिक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जेसीबीसह अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर साचलेली माती आणि दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, दरडीचे प्रमाण मोठे असल्याने आणि रस्त्याचाच काही भाग खचल्याने मार्ग पूर्णपणे सुरक्षित करण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने आणखी भूस्खलन होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच खेड-खोपी-धामणंद मार्गाऐवजी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली. पावसाळ्यात डोंगराळ भागातील रस्त्यांवर प्रवास करताना वाहनचालकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
