रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे येथे राजकीय भूकंप घडवत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का देत तालुकाप्रमुख दत्ता भिलारे यांनी आपल्या समर्थकांसह थेट शिवसेनेत उडी घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भिलारे यांनी निष्ठा बदलल्याने खेडमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत.
शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश पार पडला. भिलारे यांच्यासह भिलारे आयनी, साखरोली गावांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उबाठा गटाला रामराम ठोकत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
आत्माराम कडू, मधुकर शेट्ये, रमणा शेट्ये, सुभाष शेट्ये, खाजीराम कदम, बाळू शिंदे, रामदास परब, बाबुराव शेट्ये, तुकाराम कदम, हेमंत परब, अभिजीत कदम, निलेश पाटील, केशव शेट्ये, जयवंत शेट्ये यांसह अनेकांनी पक्षप्रवेश करून शिवसेनेची ताकद प्रचंड वाढवल्याचे बोलले जात आहे. किलोर कुटुंबातील दत्ताराम, गोविंद, रमेश, विशाल आणि रंजीत किलोर यांनीही शिवसेनेत प्रवेश करत स्थानिक पातळीवर पक्षाला मोठे बळ दिले.
या कार्यक्रमाला अनिल नवघरे, सचिन धाडवे, अरुण (अण्णा) कदम यांसारख्या स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती. या घडामोडींमुळे खेड तालुक्यात उबाठा गटाची पकड कमकुवत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून शिवसेना आक्रमक मोडमध्ये आल्याचे चित्र आहे.
