रत्नागिरी : खेड तालुक्यातील राजकीय हालचालींना अलीकडे वेग आला असून ठाकरे  गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे. घेरारसाळगड गावातील अनेक ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भरणे नाका येथील शिवसेना पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रामचंद्र बाबू आखाडे, धोंडीराम बाबू आखाडे, रामचंद्र दिनकर सावंत आणि सुभाष गंगाराम सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी समर्थकांसह पक्षप्रवेश केला.

विकासाभिमुख धोरणे आणि परिवर्तनवादी विचारसरणीमुळे हा निर्णय घेतल्याचे प्रवेशकर्त्यांनी नमूद केले. रामचंद्र आखाडे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत उबाठा पक्षाच्या वतीने सुकवली गटातून उमेदवारी दिली होती.

या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रवेशकर्त्यांना आश्वासन देताना, “तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आहे. पुढे तुमच्या विकासाची जबाबदारी आमची असेल. विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” असे स्पष्ट केले.