रत्नागिरी : कोकणातील शिमगा उत्सव हा परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपणारा सण म्हणून ओळखला जातो. त्याच उत्सवातील एक आगळीवेगळी आणि थरारक परंपरा म्हणजे खेड शहरातील ‘मढ’ काढण्याची प्रथा. होळी पौर्णिमेच्या रात्री शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली.
‘हुताशनीची प्रेतयात्रा’ अनिष्ट शक्तींवर प्रतीकात्मक प्रहारखेड शहरातील श्री देवी पाथरजाई देवी मंदिर येथे शिमगोत्सवानिमित्त होम लागल्यानंतर हनुमान मित्र मंडळ आणि परिसरातील तरुण वर्ग एकत्र येत ‘मढ’ सजवतात. एखाद्या खऱ्या प्रेतयात्रेसारखे सर्व विधी पार पाडून हे प्रतीकात्मक मढ शहरातून फिरवले जाते.
“आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा” असे म्हणत ही अंत्ययात्रा संपूर्ण शहरातून काढली जाते. काही ठिकाणी ती थांबवून नागरिक प्रतीकात्मक रडत-बोंबा ठोकत श्रद्धेची अभिव्यक्ती करतात. शहरातील सर्व इडा-पीडा दूर व्हाव्यात, कोणतेही अनिष्ट येऊ नये आणि सर्वांचे कल्याण व्हावे, या सामूहिक भावनेतून ही परंपरा जोपासली जाते.
शंभर वर्षांची अखंड परंपरा
ज्येष्ठ नागरिकांच्या मते, पूर्वजांनी शहराची दृष्ट काढण्यासाठी आणि संकटांचा नायनाट व्हावा यासाठी होळीच्या दिवशी ही प्रथा सुरू केली. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ ही परंपरा अखंड सुरू असून आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. ‘हुताशनीची प्रेतयात्रा’ असेही या विधीला संबोधले जाते.
चाकरमान्यांची विशेष उपस्थिती
ही आगळी-वेगळी परंपरा पाहण्यासाठी पुणे, मुंबईसह बाहेरगावाहून चाकरमानी खास खेडमध्ये येतात. मध्यरात्री हजारो नागरिक, युवक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पाडतात.
होमामध्ये मढाचे दहन
संपूर्ण शहरातून फिरवलेले मढ अखेरीस देवी पाथरजाई देवीच्या होमामध्ये दहन केले जाते. या विधीद्वारे शहरातील सर्व इडा-पीडा नष्ट होऊन सुख-समृद्धी नांदावी, अशी सामूहिक प्रार्थना केली जाते.खेडची ही शतकाहून जुनी परंपरा आजही तितक्याच उत्साहात आणि श्रद्धेने जपली जात असून, शिमगा उत्सवाला तिच्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि सांस्कृतिक अधोरेखित स्वरूप लाभले आहे.
