रत्नागिरी :  कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दर्जावर अवघ्या दीड महिन्यातच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वेरळ येथे उड्डाणपुलालगतचा सर्व्हिस रोड तसेच मुख्य महामार्गाचा काही भाग खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नव्याने सुरू झालेल्या या महामार्गाला पडलेले मोठमोठे तडे आणि जमिनीचे झालेले खचणे पाहता हा महामार्ग विकासाचे प्रतीक नसून वाहनचालकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गासह सर्व्हिस रोड आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालाही मोठे तडे गेल्याने संपूर्ण परिसर धोकादायक बनला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याचे आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी चिंता वाहनचालक आणि स्थानिकांनी व्यक्त केली आहे. दररोज हजारो लहान-मोठी वाहने या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या गंभीर त्रुटीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे असल्याचा आरोप होत आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त करण्याऐवजी संबंधित ठेकेदाराने खड्डे आणि तडे सिमेंट टाकून बुजविण्याचा केवळ तात्पुरता आणि दिखाऊ प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पात अशा प्रकारची मलमपट्टी करून काम भागविण्याचा प्रयत्न म्हणजे सार्वजनिक निधीचा अपव्यय असल्याची टीका होत आहे. या प्रकारामुळे कामाच्या गुणवत्तेबरोबरच देखरेख करणाऱ्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

महामार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच रस्ता खचणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून कामाच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यात यावे, दोषी ठेकेदार, सल्लागार संस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संपूर्ण रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती तातडीने करावी, अशी जोरदार मागणी खेड तालुक्यातील नागरिक, वाहनचालक आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे.

दरम्यान, वेरळ येथील खचलेल्या महामार्गाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या दर्जाबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेला महामार्ग जर दीड महिन्यातच खचत असेल, तर या प्रकल्पाच्या गुणवत्तेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.