खोपोली : खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध केपी (KP) वॉटरफॉल येथे फिरण्यासाठी आलेल्या चार युवा पर्यटकांपैकी एक तरुण पाण्यात बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. रात्रभर सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर सोमवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, चार मित्र केपी वॉटरफॉल परिसरात फिरण्यासाठी आले होते. डीपी धबधबा येथे ते वर्षा सहलीचा आनंद लुटत होते. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने त्यावेळी अभिषेक कुसवाहा (वय २३) हा पाण्यात पडून बेपत्ता झाला. सायंकाळी सातच्या सुमारास त्याच्या मित्रांनी झेनिथ ठाकूरवाडी येथे येऊन स्थानिकांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस हेल्प फाउंडेशन चे सदस्य आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. रात्री सुमारे एक वाजेपर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र अंधार आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बेपत्ता तरुणाचा शोध लागला नाही. त्यानंतर सोमवारी पहाटे साडेपाच वाजता पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. अखेर सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अभिषेक कुसवाहा याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
या घटनेत साहील हरिजन (१७), देवा गायधनकर (२२) आणि साहील (१९) हे इतर तीन मित्र सुरक्षित असून, पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. वर्षा सहलीसाठी मुंबई ठाणे आणि पुणे परिसरातून हजारो पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होतात. त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव नसते. पाण्याचे प्रवाह पावसाचा अंदाज येत नाही. उत्साहाच्या भरात हे तरुण धबधब्या जवळ जातात. पावसाचा जोर वाढल्यास धबधब्याचा प्रवाह अचानकपणे वाढतो त्यामुळे खाली असलेले वर्षा सहलीचा आनंद लुटणारे तरुण वाहून जातात. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या ठिकाणी निर्बंध लावले आहे. मात्र या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा पर्यटन स्थळांवर दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वर्षा सहली अनेकांसाठी जीव घेण्या ठरत आहेत. कर्जत येथील सोलनपाडा धरणात सांडव्यात बुडून रविवारी एका पर्यटकाचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला.
