Ajit Pawar Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झालं. एका खासगी विमानाने अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला जात होते. मात्र, यावेळी बारामतीत विमानाच्या लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाला आणि यामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी वक्तव्य केल्यामुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांचे जवळचे मित्र आणि विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक मोठा खुलासा केला आहे.

अजित पवारांची शेवटची इच्छा काय होती? त्यांनी कोणती कागदपत्रे मागवली होती? याबाबत किरण गुजर यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. ‘राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण व्हावं आणि पवार कुटुंबांनी एकत्र यावं हीच अजित पवार यांची शेवटची इच्छा होती’, असं किरण गुजर यांनी म्हटलं आहे.

किरण गुजर यांनी काय म्हटलं?

“अजित पवार यांच्या अस्थींचं आज विसर्जन करण्यात आलं आहे. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब होतं”, असं किरण गुजर यांनी म्हटलं. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणची चर्चा आहे. अजित पवारांबरोबर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणबाबत बैठक झाली होती अशी चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना किरण गुजर यांनी म्हटलं की, “हो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. ही आमची देखील इच्छा आहे आणि अजित पवार यांची देखील शेवटची इच्छा हीच होती की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे.”

“अजित पवारांशी झालेल्या माझ्या शेवटच्या फोन कॉलमध्ये त्यांनी मला निवडणुकीशी संबंधित काही कागदपत्रे मागितली होती. त्यांच्या पुढच्या प्लॅनिंगच्या संदर्भातील ती काही कागदपत्रे होती,” असंही किरण गुजर यांनी म्हटलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर सरकारमध्ये सहभागी व्हायचं की सरकारमधून बाहेर पडायचं? याबाबत अजित पवार काही बोलले होते का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना किरण गुजर यांनी म्हटलं की, “नाही, याबाबत अजित पवार काहीही बोलले नव्हते. मात्र, याबाबत पवार कुटुंबात चर्चा सुरू होत्या आणि या चर्चा सकारात्मक होत्या. अजित पवारांनी माझ्याशी बोलताना हेच म्हटलं होतं की, शेवटी एकत्र यायचं आहे.”