देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असं विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं ते म्हणाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर नड्डा यांनी केलेल्या या विधानावर भाजपाचे नेते किरीट यांनीही प्रतिक्रिया नोंदवलीय. पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्या यांना नड्डा यांच्या या टीकेवरुन प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत शिवसेनेला शाब्दिक चिमटा काढला.

नड्डा नेमकं काय आणि कधी म्हणाले?
जे पी नड्डा बिहारमध्ये भाजपाच्या १४ जिल्हा कार्यालयांचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बोलताना त्यांनी इतर प्रादेशिक पक्षांसंदर्भात विधान केलं. जे पी नड्डा म्हणाले “भाजपाच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे”. विचारधारेवर चालणारा एकमेव पक्ष असल्याने फक्त भाजपाच राहणार असा दावाही यावेळी त्यांनी केला.

जे पी नड्डा यांनी यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता पक्ष, समाजवादी पक्ष, बिजू जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती अशा अनेक पक्षांचा उल्लेख केला. “तामिळनाडूत घराणेशाही, शिवसेना जो संपत आलेला पक्ष आहे, तिथेही हेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. काँग्रेस तर आता भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे,” असं नड्डा आपल्या भाषणात म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

सोमय्यांचा शाब्दिक चिमटा
“महाराष्ट्रातून शिवसेना हळूहळू संपत आहे, असं जे. पी. नड्डा म्हणालेत,” असा संदर्भ देत पत्रकाराने सोमय्यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सोमय्या यांनी, “यासाठी कोणाला काही विचारायची गरज नाहीय. उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे कुठे? किती आमदार, खासदार आहेत हे त्यांनाच ठाऊक. अवस्था काय आहे त्या पक्षाची,” असा टोला लगावला. तसेच पुढे सोमय्या यांनी, “त्यांचा (उद्धव ठाकरेंचा) उजवा हात तुरुंगात गेलाय. त्यांचा उजवा हात संजय पांडे, माफिया पोलीस आयुक्त तुरुंगात आहे. आता डावा हात असणाऱ्या अनिल परबांविरोधात कारवाईला सुरुवात झालीय. शिल्लक काय राहिलं?” असा प्रतिप्रश्न विचारलाय.