अनिल परबांनी ठोकलेल्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

हसन मुश्रीफांनंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ परिवारातील एका सदस्या संदर्भात माझ्याकडे कागदपत्रे आहेत असे सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya reaction to Anil Parab defamation suit

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्या घोटाळ्यांबाबत पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्याची मालिका सुरु केली आहे. सोमय्यांकडून भ्रष्टाचारासंदर्भात सातत्याने आरोप केले जात आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. नोटीसीत ७२ तासाच्या आत सर्व ट्विट डिलीट करण्याचा तसेच बिनशर्त माफी मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

“असल्या फडतूस नोटीसी आणि धमक्यांना मी घाबरत नाही. ठाकरे सरकार अलिबाबा चाळीस चोरांचं सरकार आहे. या घोटाळेबाजांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. आतापर्यंत २६ घोटाळे उघडकीस आले आहेत. काहींमध्ये अधिकारी तर काहींमध्ये नेते आहेत. मी ११ जणांची यादी तयार केली होती आणि आता त्यामध्ये तिघांचा समावेश झाला आहे. आता माझे सहकारी आणखी तीन घोटाळ्यांवर काम करत आहेत,” असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

दिल्लीमध्ये कोणाची भेट घेण्यात आली असे माध्यमांनी विचारले असता सोमय्या प्रतिक्रिया दिली आहे. “हसन मुश्रीफ यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो. तुमचे पुरावे हे मजबूत आहेत आणि तपास सुरु झाल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे निश्चितपणे हसन मुश्रीफांवर कारवाई होणार,” असे सोमय्या म्हणाले.

हसन मुश्रीफांनंतर कोण असा प्रश्न विचारला असता, “माझ्याकडे जी कागदपत्रे आहेत त्यात एका विदर्भातील काँग्रेसचे मंत्री आहेत, एक शिवसेनेचे मंत्री आहेत आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ परिवारातील एका सदस्याचा समावेश आहे,” असे सोमय्या म्हणाले.

दरम्यान, सोमय्या यांच्या सततच्या बेछुट आरोपांमुळे अनिल परब यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं वकिलांमार्फत पाठवण्यात आलेल्या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. अनिल परब हे शिवसेनेचे ज्येष्ठ नते आणि मंत्री आहेत. मेहनत करून त्यांनी समाजात प्रतिष्ठा मिळवली आहे. मात्र किरीट सोमय्या यांच्या निराधार आरोपांमुळे प्रतिमा डागाळत असल्याचा उल्लेख नोटीशीत करण्यात आला आहे. तसेच नोटीशीत काही ट्वीटचा तारखेसह उल्लेख करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kirit somaiya reaction to anil parab defamation suit abn

ताज्या बातम्या