भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लोकांचे फोन टॅप केले, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केलं. तसेच दोघांचीही प्रकरणं शेवटपर्यंत जातील, असं नमूद केलं. ते मंगळवारी (१९ जुलै) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “जैसी करणी वैसी भरणी. इथल्या इथंच चुकवावं लागतं. संजय राऊत, संजय पांडे यांनी पापं केली. दहशतवाद, वसुली, माफियागिरी केली. आता ६ ऑगस्टला संजय राऊतांना शिवडी न्यायालयात उपस्थित रहावं लागणार आहे. संजय पांडेंची काल सीबीआयने चौकशी केली, आज ईडी चौकशी आहे. संजय राऊत व संजय पांडे दोघांची प्रकरणं शेवटापर्यंत जाणार आहेत.”

“संजय पांडेंच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लोकांचे फोन टॅप केले”

“संजय पांडे यांच्या कंपनीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील लोकांचे फोन टॅप करत होती. यासाठी त्यांच्या कंपनीला ४ कोटी ४४ लाख रुपये मिळाले. म्हणजे आयपीएस अधिकारीच बेकायदेशीर काम करतो. त्याला ठाकरे सरकार मुंबई पोलीस आयुक्त बनवते. त्या ठाकरे सरकारकडून महाराष्ट्राची सुटका झाली. ते महाविकास नव्हे तर महावसुली सरकार होते,” असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : मेट्रो कारशेडविरोधात पुन्हा एकदा आरे कॉलनीत आंदोलन; किरीट सोमय्या म्हणाले, “१०,००० कोटी रुपयांनी…”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारताच्या जनतेचे आहेत. महाराष्ट्राचा विकास हेच त्यांचं लक्ष्य आहे. त्यासाठी दोघांनी वाहून घेतलं आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं. एकनाथ शिंदे शिवसेना आणि पंतप्रधान मोदींचा भाजपा आता एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास करणार आहे, असंही ते म्हणाले.