भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपवल्यानंतर, ते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना वाटेत रोखल्याने त्यांना कराडहून माघारी यावं लागलं होतं. कोल्हापुर जिल्हाधिकाऱ्यांकडून देखील त्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी केली होती. शिवाय, किरीट सोमय्या मुंबईहून कोल्हापुरला जाण्यासाठी निघाल्यानंतर, कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नेते आक्रमक झाले होते आणि जर सोमय्या कोल्हापुरात आले तर त्यांचं कोल्हापुरी पायतानाने स्वागत केले जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. आता परत एकदा सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यावर जाण्याची घोषणा केलेली आहे, या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांचा उहापोह मुश्रीफ यांनी आज पुन्हा केला. सोमय्या यांच्या आरोपांचा पुनरुच्चार करून मुश्रीफ म्हणाले, “मी स्थापन केलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना ही ११ वर्षांपूर्वीची घटना आहे. तर गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना हा ब्रिक्स कंपनीने चालवण्यास देण्याची घटना १० वर्षांपूर्वीची आहे. मात्र घोरपडे कारखान्याची यापूर्वी केंद्रीय विभागाकडून चौकशी झाली आहे. त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही. तर गडहिंग्लज साखर कारखाना चालवताना ब्रिस्क कंपनीला १० वर्षात ८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. साखर कारखानदारी चालवणे हे आव्हानास्पद आहे. याची माहिती सोमय्या यांनी नितीन गडकरी यांच्यासह भाजपात प्रवेश केलेल्या साखर कारखानदारांकडून घ्यावी. काहीही आरोप करू नयेत. सोमय्या यांनी अनाठायी विधान केल्यामुळे कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भावनेतून प्रत्युत्तर दिले होते. या कार्यकर्त्यांनी सोमय्या हे कोल्हापूर येतील तेव्हा संयमाने वागावे. किंबहुना त्यांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष करावे.”

मुंबई पोलिसांनी २४ तासांत माफी मागावी; किरीट सोमय्यांची मागणी

तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन बिनबुडाचे आरोप केले, तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा देखील मुश्रीफ यांच्या समोर दिला.

कोल्हापूरला विनाकारण बदनाम करण्यासाठी येऊ नये – सतेज पाटील

सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावरील आरोपांना याअगोदर उत्तरे दिली आहेत. त्यामुळे किरीट सोमय्यांनी कोल्हापूरला विनाकारण बदनाम करण्यासाठी येऊ नये. त्यांनी दौरा टाळावा, असे आवाहन पाटील यांनी केले. अन्यथा सोमय्यांचा दौरा हाणून पाडू असा इशाराही देण्यात दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya visit to kolhapur hasan mushrifs appeal to ncp worker msr
First published on: 24-09-2021 at 18:47 IST