मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांच्या नावावर असणाऱ्या ९ एकर जमिनीवरील १९ बंगले गायब केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. याप्रकरणी आता ते मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

किरीट सोमय्यांमी आज अलिबाग येथे अ‍ॅड. अंकित बंगेरा याच्या निवासस्थानी दहा वकिलांसह याचिकेबाबत चर्चा केली. लवकरच रश्मी ठाकरे यांच्या १९ कथित बंगल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हटलं. किरीट सोमय्या यांनी उचललेल्या या पावलामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई येथील मुख्यमंत्र्यांच्या कथित बंगल्याबाबतची कागदपत्रे वकिलांना दिली आहेत. तसेच पहिल्या ड्राफ्टवर चर्चा केली आहे. वकिलांकडून आलेले सल्ले लक्षात घेऊन, येत्या आठ ते दहा दिवसांत यावर अंतिम ड्राफ्ट तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर सोमय्या मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे या कथित गैरव्यवहाराची खरी वस्तुस्थिती न्यायालायमार्फत जनतेसमोर येणार आहे, अशी प्रतिक्रिया सोमय्या यांचे वकील अ‍ॅड. किरण कोसमकर यांनी दिली.

संबंधित बैठकीस अ‍ॅड. अंकित बंगेरा यांच्यासह अ‍ॅड. किरण कोसमकर, अ‍ॅड. अमित देशमुख, अ‍ॅड. सुहास कारूळकर, अ‍ॅड. श्रीराम ठोसर, अ‍ॅड. अभिषेक सावंत, अ‍ॅड. श्रीविष्णू शशीधरण, अ‍ॅड. निखिल चव्हाण, अ‍ॅड. मिलींद साळावकर आणि अ‍ॅड. वैशाली बंगेरा आदी उपस्थित होते.