भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा शौचालय घोटाळा झाला आहे, म्हणजे ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पाहा. विक्रांतपासून ते शौचालयापर्यंत असा टोला राऊत यांनी लगावला. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आज संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“मी उघड केलेल्या सर्व घोटाळ्यांवर कारवाई झालेली आहे. तुम्ही आता हा १०० कोटींचा शौचालय घोटाळा म्हणाताय, १२ एप्रिलच्या सामनामध्ये या संदर्भातील बातमीत ३ कोटी ९० लाखांचा घोटाळा म्हटलं होतं. त्यानंतर संजय राऊत १०० कोटींचा घोटळा म्हणतात. मी तुम्हाला आव्हान देतो की एका दमडीचाही घोटाळा सिद्ध करून दाखवा. तुम्ही केवळ लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारची स्टंटबाजी करत आहात.” असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

तसेच, “उद्धव ठाकरेंकडे आता काही नाही परिवाराचे, सरकारचे सगळे घोटाळे बाहेर येत आहेत. अजित पवारांची शेकडो कोटींची मालमत्ता बेनामी घोषित होण्याच्या मार्गावर आहे. जरंडेश्वर कारखाना जप्त झाला, शेतकऱ्यांना परत देणार. ठाकरे सरकाच्या नेत्यांचे कोट्यावधींच्या घोटाळ्यांचे आम्ही पुरावे देत आहोत. मी परत पुढच्या आठड्यात दिल्लीत जाणार आहे आणि उद्धव ठाकरे परिवाराची ही दादरची मालमत्ता बेनामी घोषित करावी, मनी लाँड्रीगची चौकशी व्हावी याचा पाठवपुरावा करणार. उद्धव ठाकरे हिंमत असेल तर किरीट सोमय्याशी जाहीर चर्चा करा.” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देखील यावेळी किरीट सोमय्या यांनी दिलं.

तर, “किरीट सोमय्या व त्यांचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळय़ाची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा. खरे म्हणजे यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात राग आहे. शरद पवारांवर त्यांनी ट्विटवर ट्विट केले. एखादे ट्विट आयएनएस विक्रांत घोटाळय़ावर करायला हवे. एखादे ट्विट त्यांनी या शौचालय घोटाळय़ावर करावे.” असे संजय राऊत म्हणाले होते.