छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याजवळ बेकायदेशीर दर्गा उभारला गेला आहे, अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असा आरोप भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी स्वतः शिवनेरी किल्ल्याजवळ जाऊन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि नेमकं काय घडलं आहे ते सांगितलं आहे.
किरीट सोमय्यांनी काय म्हटलंय?
छत्रपती शिवरायांचा जिथे जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर लँड जिहाद केला जातो आहे. दरगाह शरीफ नावाचा फलक गेल्या काही महिन्यांत या ठिकाणी दिसू लागला आहे. ही किल्ल्याची बॉर्डर आहे. या ठिकाणी १०० मीटर भागात काहीही करता येत नाही. पण काही मुस्लिम आणि बांगलादेशी मुस्लिमांनी लँड जिहादवाल्यांनी खोटी अशी दर्गा उपस्थित केली आहे. तीन दिवस आम्ही वाट पाहणार आणि त्यानंतर या ठिकाणी सगळे हिंदू भक्त येऊन ठिय्या आंदोलन करणार असं म्हणत किरीट सोमय्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
किरीट सोमय्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
लँड जिहाद शिवनेरी किल्ल्यातही पोहचला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान म्हणजे जो शिवनेरी किल्ला आहे त्याच्या सीमेपासून अवघ्या २५ फुटांवर हा अनधिकृत दर्गा आहे. ही नवी नौटंकी उभी करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून इथले हिंदुत्वप्रेमी, शिवराय भक्त हे तहसीलदार, पोलीस, पुरातत्व खात्याकडे तक्रारी करत आहेत. सगळ्यांच्या समोर मी ती जागा पाहिली. किल्ल्यापासून १०० मीटरच्या परिघात कुठलंही बांधकाम करता येत नाही. या संदर्भात आम्ही पुरावे दिले. मागील दोन वर्षांत या ठिकाणी दर्गा आहे, कब्रस्तान आहे असंही भासवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा लँड जिहाद आहे आम्ही कदापी सहन करणार नाही. आम्ही गुगल मॅप, सॅटेलाइट मॅपचे पुरावे दिले आहेत. आता लँड जिहाद हे मुस्लिम अतिरेकी, कट्टरपंथी शिवरायांचा किल्लाही हडप करू इच्छितात. आम्ही त्याचा निषेध करतो आहोत. जर आठवड्याभरात जर योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही जनआंदोलन करू असा इशारा किरीट सोमय्यांनी दिला आहे.
शिवनेरी किल्ला हा ASI कडून कायदेशीर रित्या संरक्षित करण्यात आला आहे. तरीही या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलं आहे. शिवनेरी किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. मी पुरातत्व विभागाशी संबंधित मंत्री आशिष शेलार यांच्याशीही चर्चा केली. काही दिवसांत मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे. त्यातही मी हा मुद्दा मांडणार आहे. बेकायदेशीर बांधकामाविरोधात सात तक्रारी दाखल झाल्या आहेत. या मागे कोण आहे याची चौकशी केली जाणार आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
