अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले होते. मुश्रीफ यांच्या विरोधातला तिसरा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असल्याचं त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

“मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

हेही वाचा -१२७ कोटींचा भ्रष्टाचार आणि २७०० पानी पुरावे! किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ!

कायदा व सुव्यवस्थेच्या कारणासाठी कोल्हापूर दौरा रद्द केल्याने संतापलेल्या किरीट सोमय्या यांनी कराड इथं पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पुढच्या कामाची दिशा सांगितली. यावेळी लवकरच मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा बाहेर काढणार तसंच याविरोधात ईडीकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, हसन मुश्रीप यांचे जावई हे ब्रिक्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे बेनामी मालक आहेत. ही कंपनी आणि सरसेनापती कारखान्यामध्ये ५० कोटीची आर्थिक उलाढाल झाली आहे. या कंपनीत आलेले पैसे अपारदर्शक पद्धतीने आले आहेत. या व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही. एकूण १०० कोटींचा हा घोटाळा आहे.

आणखी वाचा – तुम्ही भगवा सोडा, हिरवा धारण करा पण….किरीट सोमय्या यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

127 कोटी हे मनी लोंडरिंगच्या माध्यमातून आले आहेत याचे उत्तर हसन मुश्रीफ यांनी दिलेले नाहीत, पवार साहेब ही तुमची व्युहरचना आहे का विषय डायव्हर्ट करण्यासाठी? असा सवालही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. मुश्रीफ यांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंध काय?अशी विचारणाही त्यांनी केली आहे.