भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे-पवारांवर टीका केली आहे. तर दिवाळीनंतर आपण सरकारमधल्या तीन मंत्र्यांची आणि तीन जावयांची पोलखोल करणार असंही त्यांनी सांगितलं. त्याचसोबत अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. ती कॅपेसिटी नवाब मलिकांची नाही, अशी खोचक टिप्पणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. आम्ही तसा आरोप केला होता. मात्र, ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्ध झालं आहे. त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका करण्याइतकं गलिच्छ राजकारण केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिकची एवढी कॅपेसिटी नाही”.

हेही वाचा – अजित पवारांकडे हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती; किरीट सोमय्यांचा आरोप

ते पुढे म्हणाले, “आपल्यावर चाललेल्या ईडीच्या धाडीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी अजित पवारांनी नवाब मलिकांना पुढे केल्याचं सांगावं. अजित पवारांनी एक हजार ५० कोटीची बेनामी संपत्ती कशी जमवली? पवार कुटुंबांच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले आणि कसे गेले? याचं उत्तर ठाकरे पवारांना द्यावे लागेल. या सहा फटक्यांपैकी पहिला फटका मी फोडला आहे. हिंमत असेल तर ठाकरे पवारांनी यावर उत्तर द्यावं”.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९२-९३ मध्ये दंगलीच्या काळात भाषणं केली होती. त्यांची भाषणं ऐकली असती तर त्यांना कळलं असतं दाऊद आणि पवारांचे संबंध काय आहेत? असा टोलाही त्यांनी लगावला.