“किरीट सोमय्यांना अमरावतीत येऊन वातावरण भडकवायचं आहे का?”; पालकमंत्री यशोमती ठाकूरांचा सवाल

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना अमरावतीमध्ये न जाण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथं कलम १४४ नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपला अमरावती दौरा रद्द करावा, अशी नोटीस अमरावती पोलिसांनी सोमय्या यांना जारी केली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. तसंच पोलिसांच्या या आदेशामुळे राज्य सरकारवर टीकाही केली आहे. यावरुनच आता जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ठाकूर म्हणाल्या, “आधीच अमरावतीचं खूप नुकसान झालेलं आहे. आता किरीट सोमय्यांना येऊन त्यांना इथे अजून भडकवायचं आहे का? त्यांना खरोखर खास कारणासाठी यायचंच असेल तर पंधरा दिवसांनी या, काय हरकत आहे? इथं यायचं, लक्ष वेधून घ्यायचं, काहीतरी नौटंकी करायची, पोलिसांनी आम्हाला पकडलं हे दाखवायचं आणि मग त्याच्यावर आरडाओरडा करायचा हे आम्हाला कबूल नाही. अमरावतीमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले होते, ते आम्ही निस्तरत आहोत. किरीट सोमय्यांनी येऊन आमचं गाव आमचा जिल्हा भडकवण्याचं काम अजिबात करु नये. त्यांनी दहा पंधरा दिवस येऊन महिनाभर राहिले तरी हरकत नाही”.

काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये हिंसा घडली असल्यामुळे कलम १४४ नुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अमरावतीचा दौरा रद्द करावा, अशी नोटीस अमरावती पोलिसांनी दिली आहे. किरीट सोमय्या उद्या अमरावती दौऱ्यावर जाणार होते. परंतु, त्यांच्या अमरावती दौऱ्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे. अमरावतीमध्ये शांतता प्रस्थापित झाली असून सार्वजनिक शांतता बिघडू नये आणि कायदा व सुव्यवस्था राखावी म्हणून पोलिसांनी सोमय्या यांना अमरावती दौरा रद्द करण्यास सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kirit somayya prohibited from coming to amravati yashomati thakur reacts vsk

ताज्या बातम्या