महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत असल्याने गेल्या काही दिवसांत चांगलेच चर्चेत असणारे भाजपा नेते किरीट सोमय्या हे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेचं कारण त्यांनी केलेली टीका नसून त्यांना मिळालेलं सुरक्षाकवच हे आहे. केंद्र सरकारने किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा प्रदान केली आहे. CISF चे ४० जवान आता त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत.

किरीट सोमय्या यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधल्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. आणि त्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी केंद्र सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. ही मागणी आता मान्य झाली आहे.

ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासूनच किरीट सोमय्या यांनी शिवसेनेतल्या नेत्यांविरोधात मोहीम चालू केली होती. अनिल परब, मिलिंद नार्वेकरांसह महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, तक्रारी दाखल करणं हे सुरूच होतं. गेल्या काही दिवसांपासून यामुळेच आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. त्यांची मागणी केंद्र सरकारने तात्काळ त्यांची ही मागणी मान्य केली आहे.