शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यात शेतकऱ्यांसह विविध घटकांबाबत अनेक घोषणा करण्यात आल्या. यावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस पाडल्याचा आरोप केला.

डॉ. अजित नवले म्हणाले, “अर्थसंकल्प मांडत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरळ अनुदानाची घोषणा होईल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी बाळगून होते. मात्र, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली नाही. शेतकऱ्यांकडील कांदा व्यापाऱ्यांकडे गेला की, मग अशी घोषणा करायची आणि त्यातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसायची आणि व्यापाऱ्यांचे चांगभले करायचे असाच डाव, ही घोषणा टाळण्यामागे आहे.”

An account of the work done in 10 years is presented in BJP resolution
‘मोदी की गॅरंटी’चा जाहीरनाम्यात पुनरुच्चार; भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त १० वर्षांतील कामांचा लेखाजोखा सादर
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…
Sanjay Mandlik
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना खासदार करूया; हसन मुश्रीफ यांचे आवाहन

“शेतकऱ्यांनी सन्माननिधीची मागणी कधीही केली नव्हती, घामाचा दाम द्या”

“अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या ६ हजार रुपये अनुदानाच्या जोडीला राज्य सरकार अधिकचे ६ हजार रुपये प्रतिवर्षी शेतकऱ्यांना देईल, अशी घोषणा केली. शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या निधीची कधीही मागणी केलेली नव्हती. शेतकरी घामाचे दाम मागत आहेत. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना शेतीमालाला रास्त दाम मिळाले, तर त्यातून शेतकरी नक्कीच स्वयंपूर्ण होतील आणि शेती संकटावर मात केली जाईल, ही शेतकरी संघटनांची रास्त भूमिका आहे,” असं मत अजित नवले यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

“शेतीमालाला रास्त भाव देण्याबद्दल ‘ब्र’ शब्द काढला नाही”

“अर्थसंकल्पामध्ये मात्र शेतकऱ्यांला शेतीमालाला रास्त भाव देण्याबद्दल ‘ब्र’ शब्द काढण्यात आलेला नाही. कांदा, कापूस, सोयाबीन, चिकन, अंडी, तूर, हरभरा पिकांचे भाव कोसळत असताना ते सावरण्यासाठी कोणतीही योजना आणलेली नाही. शेतीमालाला रास्त दाम मिळावे यासाठी ठोस तरतूद केलेली नाही,” असंही नवले यांनी नमूद केलं.

“असंतोष कमी करण्यासाठी १२ हजारांचा तुकडा”

अजित नवले पुढे म्हणाले, “कामाचे दाम नाकारायचे, शेतकऱ्यांची लूट सुरू ठेवायची, उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढवत ठेवायचा आणि त्यातून निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी अशा प्रकारे ६ किंवा १२ हजार रुपयांचा तुकडा शेतकऱ्यांच्या समोर करायचा असा हा प्रकार आहे. शेतकरी समुदायात यामुळे संतापाचीच भावना आहे.”

“पीक विम्याचे पैसे विमा कंपन्यांच्या तिजोरीत”

“पीक विमा योजनेत शेतकरी केवळ एक रुपया भरून सहभागी होतील व त्यांच्या वाट्याला २ टक्के असणारा विमा हप्ता सरकार भरेल अशी घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झालेला पैसाही शेवटी जनतेचा आणि शेतकऱ्यांचाच पैसा आहे. हा पैसा पिक विमा कंपन्यांच्या तिजोरीमध्ये गेल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना काही लाभ होतो का? हा मूलभूत प्रश्न आहे,” असं अजित नवले यांनी म्हटलं.

“कंपन्या आपत्तीच्या काळात पिक विमा नुकसान भरपाई देत नाही”

“मागील अनुभव पाहता कोट्यावधी रुपयाचा प्रीमियम सरकारच्या तिजोरीमधून कंपन्यांना दिला जातो. शेतकऱ्यांच्या विकासासाठीचा हा निधी कंपन्यांच्या घशात जातो. मात्र कंपन्या त्या बदल्यात शेतकऱ्यांना आपत्तीच्या काळात पिक विमा नुकसान भरपाई देत नाहीत. वेगवेगळ्या नियमांचा अडसर दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले जातात,” असा आरोप अजित नवले यांनी केला.

“पीक विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी पीक विमा योजना युनिट गावनिहाय करा”

अजित नवले म्हणाले, “शेतकऱ्यांनी आमच्या वाट्याचा २ टक्के प्रीमियम राज्य सरकारने भरावा अशी मागणी कधीही केलेली नव्हती. शेतकऱ्यांच्या मूळ मागण्या पीक विमा योजने संदर्भात वेगळ्याच आहेत. आपत्ती काळात शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी पीक विमा योजना युनिट गावनिहाय करा, नुकसान निश्चितीची पद्धत अधिक पारदर्शक बनवा. राज्य सरकारची स्वतंत्र पिक विमा योजना आणा आणि सरकारी कंपनीच्या अखत्यारीत शेतकऱ्यांना आपत्ती काळात पीक विम्याचे संरक्षण द्या, या शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्या आहेत.”

“शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल देत सवंग लोकप्रिय घोषणा”

“शेतकरी जे मागत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि शेतकऱ्यांनी जे कधीच मागितलं नव्हते ते शेतकऱ्यांना देऊन आम्ही शेतकऱ्यांसाठी किती चांगले करतोय असे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असा हा प्रकार आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल देत सवंग लोकप्रियता आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या या घोषणा आहेत,” असा आरोप अजित नवले यांनी केला.