अकोले : भंडारदरा धरण विस्थापितांच्या मागण्या मार्गी न लागल्यास भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे. या संदर्भातील निवेदन जलसंपदा विभाग व तहसीलदारांना देण्यात आले आहे. भंडारदरा धरणाला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भंडारदरा धरण शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र जसे धरण बांधण्याला १०० वर्षे झाली आहेत तसेच धरणातून जे विस्थापित झाले त्यांच्या विस्थापनालाही १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

धरणातून विस्थापित झालेल्या आदिवासींना अद्यापही पिण्यासाठी व सिंचनासाठी भंडारदरा धरणातून पाणी देण्यात आलेले नाही. धरणात बुडालेल्या जमिनीच्या बदल्यात मोबदला म्हणून दिलेल्या जमिनीही आदिवासींच्या पूर्ण नावावर करण्यात आलेल्या नाहीत. वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून आदिवासींना अद्यापही जमिनीचे मालक करण्यात आलेले नाही.

किसान सभेच्या राजुर ते लोणी ‘लॉंगमार्च’मध्ये याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना पाणी देण्याबाबत सर्वेक्षण करण्याची घोषणाही जलसंपदा मंत्र्यांनी केली तसे आदेशही काढले. जमीन नावे करण्याबाबतही मागणी मान्य करण्यात आली. मात्र याबाबतची पुढील कारवाई अद्यापही सुरू झालेली नाही. किसान सभेने या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिली असून दि. ७ एप्रिलला हजारो शेतकरी शेंडी, घाटघर, मुरशेत, भंडारदरा या भंडारद जलाशया काठच्या गावांमधून “वेहिकल मार्च” करणार आहे. लाँग मार्चला दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कारवाई न झाल्यास भंडारदरा धरण शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.

भंडारदरा धरणाच्या मागील सर्व गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी निळवंडे उच्चस्तरीय कालव्याच्या धर्तीवर गुरुत्वाकर्षण पद्धतीने द्यावे यासाठी तीन प्रस्ताव किसान सभेच्या वतीने सादर करण्यात आले आहेत. राजुर लोणी लॉंगमार्चच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रालयस्तरीय बैठकीत या प्रस्तावांची व्यावहारिकता व तांत्रिक बाबी तपासून सर्वेक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. मात्र संबंधित विभाग या आदेशाची अंमलबजावणी करण्यात चालढकल करत असल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

जलसंपदा विभागाच्या शेंडी (भंडारदरा) येथील कार्यालयावर दि. ७ एप्रिलला निदर्शने करण्यात येणार आहेत. सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ताराचंद विघे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, राजाराम गंभीरे आदी कार्यकर्ते आंदोलनासाठी प्रयत्नशील आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची जीवनरेखा असणाऱ्या भंडारदरा धरणाचे लोकार्पण १० डिसेंबर १९२६ रोजी करण्यात आले. या घटनेला आगामी २६ डिसेंबरला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष शासनाच्या वतीने साजरे करण्यात येणार आहे.