सातारा: किसन वीर साखर कारखान्याला आज महाराष्ट्र सरकारकडून वस्तू व सेवा कर विभागाचा सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जीएसटी भरणा केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट करदाता (टॉप टॅक्स पेअर) पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे किसन वीर कारखान्यावरील पारदर्शक कारभाराचा आणि आर्थिक शिस्तीचा मोठा सन्मान असल्याची भावना कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केली.
शिंदे पुढे म्हणाले की, काही वर्षांपूवी किसन वीर साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. उसाचा तुटवडा, कामगारांचे प्रश्न, वीज दरवाढ आणि कर्जबाजारीपणा, गैरवस्थापन यामुळे कारखान्याची गळचेपी झालेली होती.
ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांच्या हिताकरिता सूत्रे घेत मदत व पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील व उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने संस्थेच्या बाबतीत कठोर निर्णय घेत, व्यवस्थापनात आमूलाग्र सुधारणा केल्या आणि एक स्पष्ट, भविष्यमुख आराखडा तयार केला. कारखान्याने आपल्या युनिटमध्ये तांत्रिक सुधारणा केल्या. कारखान्याकडील अस्तित्वात असणारे सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक वीजनिर्मिती प्रकल्प, आसवनी प्रकल्प आणि इथेनॉल प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले. शेतकऱ्यांशी थेट संवाद ठेवत त्यांना एफआरपीची रक्कम वेळेवर देऊन कारखान्यावरील विश्वास परत मिळविला. आर्थिक शिस्त पाळत, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून नियमितपणे जीएसटी, आयकर (इन्कम टॅक्स) आणि इतर कर भरण्यावर भर देऊन शासकीय पातळीवरही नावलौकिक मिळविला आहे. हा पुरस्कार म्हणजे त्याचाच परिपाक असल्याचे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व संचालक मंडळ यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.