बारामती नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक किशोर मासाळ यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये किशोर मासाळ यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

किशोर मासाळ यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी संताप व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नगरसेवक किशोर मासाळ यांना अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं चांगलंच भोवलं असून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

“बारामतीमधील एका नगरसेवकाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, याची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधित नगरसेवकाचं जे वक्तव्य आहे, ज्या अजित पवार यांच्यामुळे त्या नगरसेवकाला राजकारणात स्थिरता मिळाली, माझ्या माहितीनुसार, किशोर मासाळ हे बारामती नगर परिषदेत बिनविरोध नगरसेवक झाले आहेत. या घृणास्पद व्यक्तीचं एवढं मोठं कर्तृत्व देखील नव्हतं. पण अजित पवारांची साथ आणि पाठबळ पाठिमागे होतं म्हणून ते नगरसेवक झाले. आता या सर्व प्रकरणाची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने किशोर मासाळ यांची राष्ट्रवादीमधून तात्काळ हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे.

किशोर मासाळ यांनी मागितली माफी

“चार दिवसांपूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून अजित पवार यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं. माझ्या या वक्तव्याबद्दल अजित पवार यांचं कुटुंबीय आणि बारामतीकरांसह सर्व जनतेची मी हात जोडून माफी मागतो. मला यामध्ये खूप पश्चाताप झाला आहे आणि याचं प्रायश्चित्त म्हणून मी उद्या एक दिवसांचं अन्नत्याग आंदोलन करून आत्मक्लेश करणार आहे”, असं किशोर मासाळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.